टोकिओ – रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर, चीन देखील तैवान ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाई करू शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी यावरून अमेरिकेला थेट शब्दात इशारा दिला आहे. ‘तैवानबाबतचे धरसोडीचे धोरण सोडून देऊन, अमेरिकेने चीनच्या हल्ल्यापासून आपण तैवानचे रक्षण करू, असे जाहीर करावे, अशी मागणी ऍबे यांनीकेली. त्याचवेळी तैवानवरील चीनचा हल्ला म्हणजे जपानवरील हल्ला ठरेल, असे ऍबे यांनी आणखी एकवार बजावले आहे.
तैवानपासून जपानचे योनागुनी बेट अवघ्या ११० किमी अंतरावर आहे. त्यामुळे एकदा का चीनने हल्ला चढवून तैवानचा ताबा घेतला की जपान असुरक्षित बनेल. कारण यामुळे जपानच्या सागरी व हवाई क्षेत्रावर वर्चस्व गाजविणे चीनसाठी सोपे जाईल. म्हणूनच जपानच्या सुरक्षेसाठी तैवान देखील चीनपासून सुरक्षित राहणे आवश्यक असल्याचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी लक्षात आणून दिले. नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब परखडपणे मांडली. इतकेच नाही तर तैवानच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणार्या अमेरिकेला ऍबे यांनी धारेवर धरले आहे.
चीन तैवानबाबत लष्करी आक्रमकतेचे प्रदर्शन करीत असताना, अमेरिका चीनमध्ये गुंतवणूक करीत असल्याचे उघड होत आहे. ही बाब चीनचा उत्साह वाढवणारी ठरते. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर चीनची आक्रमकता अधिकच वाढण्याची शक्यता आहे. कारण रशियाने तैवान हा चीनचाच भाग असल्याचे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत तैवानवरील चीनच्या हल्ल्याची शक्यता वाढलेली आहे. अशा निर्णायक काळात अमेरिकेची धोरणात्मक पातळीवर धरसोड सुरू आहे, ही चीनसाठी पोषक बाब ठरते, हे जपानच्या माजी पंतप्रधानांनी लक्षात आणून दिले.
याबरोबरच युक्रेनवर हल्ला चढवून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युरोपिय देशांना आरसा दाखवला आहे, असा टोला ऍबे यांनी लगावला. युरोपिय देश आपल्या सहकारी देशाची सुरक्षा करू शकले नाहीत. उलट त्यांना रशिया व चीनमधील आपल्या कंपन्यांच्या गुंतवणुकीची अधिक चिंता वाटत आहे. चीन ‘सप्लाय चेन क्रायसिस’द्वारे आपल्याला अडचणीत टाकू शकतो, या भीतीने युरोपिय देश चीनच्या विरोधात भूमिका घेण्याचे टाळत असल्याचा गंभीर आरोप ऍबे यांनी केला.
अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या अशा बेजबाबदारपणामुळे युक्रेनच्या पाठोपाठ तैवान देखील धोक्यात आला आहे, असे स्पष्ट संकेत ऍबे यांनी या मुलाखतीत दिले आहेत.
जपानने अमेरिकेची अण्वस्त्रे तैनात करण्यावर विचार करावा – शिंजो ऍबे यांची शिफारस
जपानने अमेरिकेची अण्वस्त्रे आपल्या देशात तैनात करण्यावर विचार सुरू करावा, असे माजी पंतप्रधान ऍबे यांनी सुचविले आहे. तैवानवरील चीनच्या हल्ल्याचा धोका वाढल्याचे सांगत असताना, ऍबे यांनी ही मागणी करून खळबळ माजविली आहे. अण्वस्त्रमुक्त जगासाठी जपान प्रयत्न करीत आहे. अण्वस्त्रांना विरोध करण्याची जपानची भूमिका आहे. पण ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, अशा देशांबरोबर ‘न्यूक्लिअर शेअरिंग’ अर्थात अण्वस्त्रांबाबत सहकार्य करण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न ऍबे यांनी उपस्थित केला. अण्वस्त्रधारी देशांबरोबर असे सहकार्य प्रस्थापित करून अण्वस्त्रांच्या वापराबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अण्वस्त्रे नसलेल्या देशांना सहभागी करून घेता येईल, असे ऍबे यांचे म्हणणे आहे. त्यांची ही मागणी चीनचे डोळे पांढरे करणारी ठरू शकते. तैवानबाबत माजी पंतप्रधान ऍबे फारच आक्रमक धोरण स्वीकारीत असल्याच्या तक्रारी चीन करीत आहे. यावरून चीन जपानला धमक्या देत आहे. अशा परिस्थितीत ऍबे यांनी सुचविलेल्या या अण्वस्त्रांच्या पर्यायावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.