वॉशिंग्टन/बीजिंग – ऑस्ट्रेलियात चीनने घडवलेल्या सायबरहल्ल्यांचा मुद्दा अमेरिका व चीनमधील वादात नवी भर टाकण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी याप्रकरणी चीनला धारेवर धरले असून चीन इतर देशांविरोधात बळजबरीचे धोरण राबवित असल्याचा आरोप केला. तर चीनने ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेचा हस्तक बनवल्याचा ठपका ठेवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियातल्या सरकारी, राजकीय तसेच व्यावसायिक यंत्रणांवर सायबरहल्ले वाढल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी जाहीर केले होते. या सायबरहल्ल्यांमागे एका देशाचा हात असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन माध्यमे व अभ्यासगटांनी सायबरहल्ल्यांमागे चीनचाच हात असल्याचा आरोप केला होता. मात्र चीनने हे आरोप फेटाळले होते.
सायबरहल्ल्यांवरून ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये पेटलेल्या वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, चीन ऑस्ट्रेलियावर बळजबरी करीत असल्याचा आरोप केला. चीनने ऑस्ट्रेलियन उत्पादनांच्या आयातीवर वाढविलेले कर आणि काही उत्पादनांवर घातलेली बंदी याकडे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियाविरोधात चीनकडून सुरू असलेल्या या कारवायांचा मुद्दा आपण चीनचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतही उपस्थित केल्याचा दावा परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी केला.
ऑस्ट्रेलियाच्या समर्थनार्थ चीनला फटकारण्याची गेल्या महिन्याभरातील अमेरिकेची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन उत्पादनांवर लागलेल्या कराच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनवर टीकास्त्र सोडले होते. कोरोनाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चीनने आर्थिक परिणामांची धमकी दिली. हे योग्य नसून याप्रकरणी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ऑस्ट्रेलिया-चीन वादात अमेरिका ऑस्ट्रेलियाबरोबर असल्याची ग्वाही दिली होती.
अमेरिकेकडून चीनवर होणारी ही टीका कोरोनाची साथ व इतर मुद्द्यांवरून चीन विरोधात सुरू असलेल्या व्यापक राजनैतिक संघर्षाचा भाग मानला जातो.
दरम्यान, सायबरहल्ल्यांच्या मुद्द्यावरून चीनकडे बोट दाखविणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चीनने नवा टोला लगावला आहे. चीनला बदनाम करण्याच्या मोहिमेत ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेचा हस्तक बनल्याची कडवट टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. ऑस्ट्रेलियाचा आरोप व अमेरिकी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांच्या वक्तव्याने चीन बिथरल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिक्रियेतून दिसून येते.
गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाने आपल्या देशात होणारी चिनी गुंतवणूक रोखण्यासाठी आक्रमक निर्णय घेतले होते. तसेच ऑस्ट्रेलियावरील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सरकारने कठोर निर्णय घेऊन चीनला धक्का दिला होता. पॅसिफिक महासागरातील चीनच्या कारवायांनाही पंतप्रधान मॉरिसन यांनी कडवा विरोध दर्शविला होता.