अणुकार्यक्रमावरील तणाव वाढत असतानाच अमेरिका व इराणच्या युद्धनौका आमनेसामने

US-warshipवॉशिंग्टन/तेहरान – इराणच्या अणुकार्यक्रमावरील बोलणी स्थगित झाल्याने अमेरिका व इराणमधील तणाव वाढत असतानाच, दोन्ही देशांच्या युद्धनौका धोकादायकरित्या आमनेसामने आल्याची घटना उघड झाली. अमेरिकेच्या ‘फिफ्थ फ्लीट’ने या घटनेची माहिती दिली आहे. त्यानुसार अमेरिकी युद्धनौका होर्मुझच्या आखातातून प्रवास करीत असतानाच इराणच्या स्पीडबोट्सनी अवघ्या 50 यार्डांवरून प्रवास केला. यावेळी अमेरिकी युद्धनौकांनी ‘वॉर्निंग सिग्नल’ तसेच ‘फ्लेअर’चा वापर करून इराणी स्पीडबोट्सना पिटाळल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले.

इराणच्या अणुकरारावर सुरू असलेली बोलणी सध्या फिस्कटल्याचे मानले जाते. इराणकडून अण्वस्त्रनिर्मितीसाठी सेंट्रिफ्युजेस कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगानेही इराण युरेनियमचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला आहे. इराणमधील भूमिगत अणुप्रकल्प असणाऱ्या फोर्डोमध्ये ही प्रक्रिया सुरू असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे इराण पुन्हा एकदा अण्वस्त्रनिर्मितीच्या दिशेने वेगाने पावले उचलत असल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळाला आहे.

iran-guards-fast-boatइराणच्या आण्विक कारवाया वाढल्या असतानाच होर्मुझच्या आखातात घडलेल्या घटनेने इराण व अमेरिकेतील तणाव अधिकच वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेच्या ‘फिफ्थ फ्लीट’चा भाग असलेल्या ‘युएसएस सिरोक्को’ व ‘युएसएनएस चॉक्टोव काऊंटी’ सोमवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पर्शियन आखातात प्रवेश करीत होत्या. त्याचवेळी इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍‘चा भाग असणाऱ्या तीन स्पीडबोट्स या युद्धनौकांजवळ आल्या.

यातील एक स्पीडबोट अमेरिकी युद्धनौकेपासून अवघ्या 50 यार्डाच्या अंतरावर आली होती. अमेरिकी युद्धनौकेने इशारे देत या स्पीडबोटला पिटाळून लावले. या घटनेचा व्हिडिओदेखील अमेरिकेच्या नौदलाने प्रसिद्ध केला आहे. सदर घटना सागरी सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत धोकादायक असल्याचे अमेरिकी नौदलाने म्हटले आहे. इराणने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र यापूर्वीही इराणच्या स्पीडबोट्सनी अमेरिकेसह इतर परदेशी युद्धनौकांजवळून धोकादायकरित्या प्रवास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

leave a reply