अमेरिकेकडून युक्रेनला 40 कोटी डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा

शस्त्रसहाय्याची घोषणावॉशिंग्टन/किव्ह – रशियन फौजांच्या माऱ्यापुढे युक्रेनी लष्कराचा प्रतिकार क्षीण होत असल्याचे संकेत मिळत असतानाही अमेरिकेने युक्रेनला पुन्हा एकदा शस्त्रसहाय्याची घोषणा केली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये अमेरिकेने युक्रेनला शस्त्रसहाय्य जाहीर करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. या घोषणेनंतर अमेरिकेने युक्रेनला केलेल्या शस्त्रसहाय्याचे मूल्य 32 अब्ज डॉलर्सवर गेले आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेणाऱ्या युक्रेनी लष्करी तुकड्यांनाही भेट दिली होती.

शस्त्रसहाय्याची घोषणायुक्रेनमध्ये करण्यात येणाऱ्या शस्त्रपुरवठ्याच्या मुद्यावरून अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात संघर्ष सुरू झाल्याच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य व वरिष्ठ नेते युक्रेनला देण्यात येणाऱ्या शस्त्रपुरवठ्याचा योग्य हिशोब ठेवावा तसेच त्याचा ओघ कमी करावा, अशी मागणी करीत आहेत. तर अमेरिकेतील काही संरक्षण अधिकारी व विश्लेषक युक्रेनने आता शस्त्रखरेदीसाठी रोख मूल्य मोजायला हवे, असे बजावत आहेत. त्याचवेळी संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युक्रेनमध्ये पाठविण्यात आलेल्या शस्त्रांचा ‘ट्रॅक’ ठेवणे कठीण असल्याची कबुलीही संसदेत दिली आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनी लष्कराच्या महत्त्वाच्या व अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याचे कारण देत नव्या शस्त्रसहाय्याची घोषणा केली. यात ‘आर्मर्ड व्हेईकल लाँच्ड् ब्रिजेस’चा समावेश आहे. सशस्त्र वाहनांवर तैनात असणारे हे ब्रिजेस पाण्याचे प्रवाह व इतर अडथळे ओलांडण्यासाठी उपयुक्त मानले जातात. याव्यतिरिक्त ‘हायमार्स रॉकेटस्‌‍’, ‘लेझर गायडेड रॉकेट सिस्टिम्स’ व तोफगोळ्यांचा समावेशही शस्त्रसहाय्यात आहे. याव्यतिरिक्त प्रशिक्षण तसेच देखभालीसाठीही निधीची तरतूद करण्यात आल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. नव्या शस्त्रसहाय्याअंतर्गत पुरविण्यात येणारी शस्त्रे अमेरिकी संरक्षण विभागाच्या साठ्यातून देण्यात येणार आहेत.

leave a reply