वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेने चीनमध्ये जाणाऱ्या व चीनमधून येणार्या प्रवासी विमानांच्या वाहतुकीवर बंदीची घोषणा केली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली विमान वाहतूक सुरू करण्यासाठी अमेरिकेच्या दोन प्रवासी विमान कंपन्यांनी चीनची परवानगी मागितली होती. मात्र चीनने परवानगी नाकारल्याने अमेरिकेने कारवाईदाखल चीनच्या विमानांवर बंदीचे आदेश दिले आहेत. अमेरिकेचा हा निर्णय दोन देशांमधील तणाव अधिकच चिघळवणारा ठरला आहे.
चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात पूर्णपणे प्रवासबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे अमेरिकेच्या प्रवासी विमान कंपन्यांनी चीनमध्ये जाणाऱ्या व चीनमधून येणाऱ्या प्रवासी विमानांच्या फेऱ्या पूर्णपणे थांबवल्या होत्या. साथीच्या पार्श्वभूमीवर चीनमधील प्रवासी विमानांची वाहतूक पूर्णपणे थांबवणारा अमेरिका हा पहिला देश ठरला होता. ट्रम्प यांच्या निर्णयावर त्यावेळी चीनने जोरदार टीका केली होती. मात्र जगभरात फैलावलेल्या कोरोनाच्या साथीने ट्रम्प यांनी त्यावेळी घेतलेला निर्णय बरोबर असल्याचे सिद्ध झाले होते.
कोरोना साथीमुळे ठप्प झालेले व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी जगातील वेगवेगळे देश प्रयत्न करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून प्रवासी विमानांची वाहतूक चालू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेच्या ‘डेल्टा’ व ‘युनायटेड’ या दोन प्रवासी विमान कंपन्यांनी चिनी सरकारकडे विमानांच्या फेऱ्या सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र चीनच्या यंत्रणेने परदेशी विमान कंपन्यांबाबतच्या नव्या नियमांचे कारण पुढे करत अद्यापही अमेरिकेच्या कंपन्यांना परवानगी दिलेली नाही.
चीनच्या चार प्रवासी विमान कंपन्यांना अमेरिकेत परवानगी असताना अमेरिकी कंपन्यांना परवानगी नाकारणे हा ‘एअर ट्रान्स्पोर्ट एग्रीमेंट’चा भंग ठरतो, असा आरोप अमेरिकेच्या ट्रांसपोर्टेशन डिपार्टमेंटने केला आहे.चीनच्या आततायी धोरणाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही चिनी कंपन्यांच्या अमेरिकेतील वाहतुकीवर पूर्ण बंदी घालत असल्याचे जाहीर केले आहे. ही बंदी १६ जून पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आदेश दिल्यास त्यापूर्वीही बंदीचे अंमलबजावणी होईल अशी माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली.
ट्रम्प प्रशासनाचा हा नवा निर्णय चीनविरोधात सुरू असलेल्या आक्रमक व्यापारी व राजनैतिक संघर्षाचा भाग आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सर्व बाजूंनी चीनवर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चीनने माघार घेतली नाही तर प्रसंगी चीनबरोबरील संबंध तोडण्यासारखे टोकाचे पाऊलही अमेरिका उचलू शकते, हे प्रवासी विमान कंपन्यांवरील बंदीच्या निर्णयातून दिसून येत आहे.