अमेरिका-ब्रिटन-युरोपिय महासंघाचे रशियावर कडक निर्बंध

वॉशिंग्टन/लंडन/ब्रुसेल्स – युक्रेनमध्ये सैन्य घुसविणार्‍या रशियावर पाश्‍चिमात्य कडक निर्बंधांची घोषणा केली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या सरकारमधील वरिष्ठ नेते, संलग्न उद्योगपती, बँका आणि व्यापारी वर्ग यांच्यावर अमेरिका, ब्रिटन व युरोपिय महासंघाने निर्बंध जाहीर केले. रशियातील सेमीकंडक्टर आणि लष्कराशी जोडलेल्या कंपन्यांना पाश्‍चिमात्य देशांनी या निर्बंधांमध्ये लक्ष्य करण्यात आले आहे. या आठवड्यात पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर दुसर्‍यांदा निर्बंध लादले आहेत.

रशियावर कडक निर्बंधदोन दिवसापूर्वीच रशियाने दोन देशांना मान्यता दिल्यानंतर अमेरिका, युरोपिय महासंघ आणि जपान यांनी रशियावर निर्बंध लादले होते. रशियाच्या दोन प्रमुख बँकांसह राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे निकटवर्तीय आणि रशियन संसदेतील सुमारे ३५० सदस्यांवर निर्बंधाची कारवाई झाली होती. पाश्चिमात्य देशांचे हे निर्बंध अतिशय तोकडे असून याचा रशियावर कसलाही परिणाम होणार नाही, अशी टीका ब्रिटनमधील माध्यमांनी सुरू केली होती. त्यामुळे रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसल्यानंतर पाश्चिमात्य देशांकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाणे अपेक्षित होते.

गुरुवारी रशियन फौजा युक्रेनमध्ये दाखल झाल्यानंतर अमेरिका, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया अशा सर्वच देशांनी व युरोपिय जोरदाराने रशियावर जोरदार टीका केली. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपिय महासंघाने रशियाच्या ऊर्जा क्षेत्राला वगळता इतर सर्व क्षेत्रांवर आणि संबंधितांवर निर्बंध लादले. रशियाकडून युक्रेनमार्गे येणार्‍या इंधन गॅसवायूवरच युरोपिय देश अवलंबून आहेत. रशिया-युक्रेनमधील तणावामुळे याआधीच युरोपिय देशांमधील इंधन गॅसवायूचे दर कडाडले आहेत. त्यामुळे रशियाच्या ऊर्जा क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधितांवर कारवाई केल्यास त्याचे उलट परिणाम आपल्यावर होतील, याची जाणीव युरोपिय देशांना आहे.

रशियावर कडक निर्बंधरशियावर टाकलेले नवे निर्बंध अतिशय कठोर असल्याचा दावा अमेरिका व ब्रिटन करीत आहेत. या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होतील, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केला. यानुसार अमेरिकेने रशियाला स्विफ्ट पेमेंट सिस्टीम मधून बाहेर काढले आहे. यामुळे रशियाच्या जगभरातील बँक व्यवहारांवर परिणाम होतील, असे अमेरिकन माध्यमांचे म्हणणे आहे. याहून अधिक कठोर कारवाई केली तर त्याचा थेट परिणाम युरोपिय देशांवरही होईल, याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत आहेत. ब्रिटनने रशियाविरोधात दहा कलमी निर्बंध जाहीर केले. यानुसार ब्रिटनने रशियाच्या दोन बड्या बँकांची खाती गोठवली. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निकटवर्तीयांवर आणि कुटुंबियांवर ही निर्बंधाची कारवाई झाली असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर रशियाच्या आघाडीच्या प्रवासी विमान वाहतूक कंपनीलाही ब्रिटनने प्रवेश नाकारला आहे. पाश्चात्य मित्रदेशांनी रशियन लष्कराची कोंडी करण्याच्या उद्देशाने प्रमुख उच्च-तंत्रज्ञानाच्या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली. हे निर्बंध रशियाच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांना लक्ष्य करणारे असून आणि त्यात सेमीकंडक्टर, दूरसंचार, सुरक्षा उपकरणे, लेझर आणि सेन्सर यांचा समावेश आहे.

leave a reply