पाकिस्तानच्या ‘एफ-16’ लढाऊ विमानांबाबत घेतलेल्या निर्णयावर अमेरिकेची सारवासारव

‘एफ-16’नवी दिल्ली – पाकिस्तानच्या हवाई दलातील ‘एफ-16’ विमानांचे सुट्टे भाग पुरविण्याची तयारी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात पाकिस्तानचे लष्करी सहाय्य रोखण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय फिरवून बायडेन प्रशासनाने पाकिस्तानच्या एफ-16 विमानांचे सुट्टे भाग पुरविण्याची तयारी केली आहे. यावर भारताकडून चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच, अमेरिकेने त्यावर खुलासा दिला आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण व मध्य आशियाई विभागाचे उपमंत्री डोनाल्ड लू यांनी अमेरिका पाकिस्तानला केवळ या विमानांच्या सुट्ट्या भागाची विक्री करीत असल्याचे सांगून हे सहाय्य ठरत नाही, असा दावा केला आहे.

अमेरिकेकडून मिळालेली ‘एफ-16’ विमाने पाकिस्तानच्या हवाई दलाचा प्रमुख आधार मानला जातो. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर असताना, या विमानांसाठी पाकिस्तानला सहाय्य पुरविण्यास साफ नकार दिला होता. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तानने अमेरिकेचा विश्वासघात केला, असा ठपका ठेवून ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करी सहाय्य रोखले होते. यामुळे आपल्या हवाई दलाच्या ताफ्यातील ही एफ-16 विमानांचा वापर करणे पाकिस्तानसाठी अवघड बनले होते. पण बायडेन प्रशासनाने ट्रम्प यांचा निर्णय फिरवून पकिस्तानसाठी एफ-16च्या सुट्ट्या भागांची व या विमानांच्या देखभालीची सोय करून दिली. हा सुमारे साडेचार कोटी डॉलर्सचा व्यवहार असल्याचे सांगितले जाते.

‘एफ-16’या निर्णयावर भारतातून प्रतिक्रिया उमटल्या. भारत हा आपला धोरणात्मक भागीदार देश असल्याचे सांगणाऱ्या अमेरिकेकडून पाकिस्तानला पुरविले जाणारे हे सहाय्य नजरेत भरणारे ठरते, अशी टीका भारतीय विश्लेषकांनी केली होती. त्यावर अमेरिकेने खुलासा दिला आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण व मध्य आशियाई विभागाचे उपमंत्री डोनाल्ड लू यांनी यावर सारवासारव करणारी माहिती दिली. पाकिस्तानच्या हवाईदलाकडे असलेली ‘एफ-16’ विमाने चाळीस वर्ष जूनी आहेत. त्यांचे सुट्टे भाग व त्यांच्या पंखांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली मदत अमेरिका करीत आहे. याचा अर्थ अमेरिका पाकिस्तानला नवे तंत्रज्ञ्ाान किंवा सहाय्य पुरवित आहे, असा होत नाही. तर अमेरिका पाकिस्तानला या विमानांच्या सुट्ट्या भागांची विक्री करीत आहे. एवढ्यापुरताच हा व्यवहार मर्यादित आहे, असे डोनाल्ड लू म्हणाले.

चाळीस वर्षांपूर्वीच्या ‘एफ-16’ विमानांची दुरूस्ती झ्ााली नाही, तर हे विमान अपघातग्रस्त होईल आणि यामुळे वैमानिकाचा जीव जाईल. हे टाळण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतलेला आहे. जगभरात अमेरिकेने विक्री केलेली विमाने किंवा इतर यंत्रणांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी अमेरिका अशा प्रकारच्या सेवा इतरांना पुरवित आलेली आहे. हा अमेरिकेच्या धोरणाचा भाग ठरतो, असेही डोनाल्ड लू यांनी स्पष्ट केले.

अमेरिका असे दावे करीत असली तरी प्रत्यक्षात भारताच्या विरोधातील आपली नाराजी व्यक्त करण्यासाठीच अमेरिकेने पाकिस्तानला हे सहाय्य पुरविण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत. युक्रेनचे युद्ध किंवा भारतीय वायुसेना व नौदलासाठी लढाऊ विमानांच्या खरेदीसंदर्भात निर्णय घेताना भारत आपले हितसंबंध जपत नाही, अशी अमेरिकेची तक्रार आहे. यामुळे भारताला इशारा देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाने पाकिस्तानला दिलासा देणारा हा निर्णय घेतल्याचे दिसते आहे.

leave a reply