अमेरिकेची युरोपातील तैनाती हे विध्वंसक पाऊल

- रशियाचे टीकास्त्र

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युरोपातील सैन्यतैनातीबाबत केलेली घोषणा हे विध्वंसक पाऊल असून त्यामुळे या क्षेत्रातील तणाव अधिकच वाढल्याची टीका रशियाने केली आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युरोपात तीन हजार अतिरिक्त जवान पाठविण्याची घोषणा केली होती. बायडेन ही घोषणा करीत असतानाच व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या तसेच युक्रेनच्या मंत्र्यांनी रशिया तातडीने हल्ला करण्याची शक्यता नसल्याची वक्तव्ये केल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेची युरोपातील तैनाती हे विध्वंसक पाऊल - रशियाचे टीकास्त्ररशिया व युक्रेन सीमाभागात लष्करी तैनातीबाबत सातत्याने नवनवीन दावे समोर येत आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाला रोखण्यासाठी जोरदार राजनैतिक प्रयत्नही सुरू आहेत. अमेरिका, नाटो व रशियामध्ये आतापर्यंत झालेल्या राजनैतिक चर्चांमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. दोन्ही बाजू राजनैतिक पातळीवरील चर्चा चालू ठेवण्याचे संकेत देत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी नव्या तैनातीचा निर्णय घेणे रशिया-युक्रेन संघर्षाची शक्यता अधिक वाढल्याचे संकेत देणारे ठरते.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युरोपिय देशांमध्ये तीन हजार अतिरिक्त जवान तैनात करण्याचा निर्णय घेतल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जर्मनी, पोलंड व रोमानिया या तीन देशांमध्ये हे अतिरिक्त जवान तैनात होणार आहेत. या निर्णयापूर्वी अमेरिकेने युरोपात तैनात असणाऱ्या लष्करी तुकड्यांपैकी साडेआठ हजार जवानांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेची युरोपातील तैनाती हे विध्वंसक पाऊल - रशियाचे टीकास्त्रअमेरिकेचे लष्करी पथक युक्रेनच्या संरक्षणदलांना प्रशिक्षण देत असल्याचेही उघड झाले आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेने युक्रेनला 500 टनांहून अधिक लष्करी सामुग्री धाडली असून त्यात क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे.

रशियाने अमेरिकेसह नाटोच्या हालचालींवर आधीच नाराजी व्यक्त केली होती. नव्या सैन्यतैनातीच्या घोषणेनंतर रशियाने अधिकच आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमेरिकेची नवी तैनाती विध्वंसकारी पाऊल असून त्याने युरोपातील तणावात अधिकच भर पडली आहे. युक्रेन मुद्यावर राजकीय तोडगा निघण्याची शक्यता धूसर झाली आहे. नव्या निर्णयामुळे फक्त युक्रेनच्या राजवटीलाच आनंद झाला असेल`, असे टीकास्त्र रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री अलेक्झांडर ग्रुश्‍को यांनी सोडले.

दरम्यान, बुधवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती दिली आहे. चर्चेदरम्यान पंतप्रधान जॉन्सन यांनी रशियाला युक्रेनवरील हल्ल्याबाबत इशारा दिल्याचे वृत्त ब्रिटीश माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.

leave a reply