सेऊल – उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा आणि अमेरिका व दक्षिण कोरियाचा युद्धसराव यामुळे कोरियन क्षेत्रातील परिस्थिती चिघळत चालली आहे. उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर अमेरिकेने देखील थेट दक्षिण कोरियामध्ये लांब पल्ल्याचे ‘बी-१बी लान्सर’ सुपरसोनिक बॉम्बर्स तैनात केले आहेत. २०१७ सालानंतर पहिल्यांदाच दक्षिण कोरियात सुपरसोनिक बॉम्बर्सची तैनाती करून अमेरिकेने उत्तर कोरियाला इशारा दिला आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल यांनी अमेरिकेकडे बॉम्बर विमानांच्या तैनातीची मागणी केली होती. दोन आठवड्यांपूर्वी दक्षिण कोरियाच्या वृत्तसंस्थेने याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. अमेरिकेने देखील दक्षिण कोरियाची मागणी मान्य करून लवकरच बी-१बी बॉम्बर्स रवाना करणार असल्याचे जाहीर केले होते. पण ही तैनाती कधी होईल, याची माहिती समोर आली नव्हती.
शुक्रवारी उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या बॉम्बर्स विमानांबरोबर सराव केल्याचे जाहीर केले. त्याआधी अमेरिकेच्या विमानांनी लेझर गायडेड बॉम्ब हल्ल्यांचा सराव केला होता. उत्तर कोरियाला इशारा देण्यासाठी हा सराव पार पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या बी-१ बॉम्बर्स विमानांच्या तैनातीची घोषणा केली.
दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने या बॉम्बर्स विमानांच्या तैनातीचे स्वागत केले. तसेच उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका दक्षिण कोरिया आणि आपल्या मित्रदेशांच्या सुरक्षेबाबत वचनबद्ध असल्याचे या तैनातीतून दिसत असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या तैनातीच्या आधी अमेरिकन बॉम्बर्सनी दक्षिण कोरियाच्या एफ-३५ स्टेल्थ विमानांबरोबर सराव केला होता.
अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील राजधानी वॉशिंग्टन व न्यूयॉर्क सारख्या महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करू शकणाऱ्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन उत्तर कोरियाने मोठी चूक केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच उत्तर कोरियाच्या या धोक्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे.