अमेरिकेने अलास्काच्या हवाईहद्दीत ‘युएचएओ’ पाडले

पेंटॅगॉनच्या माध्यम सचिवांची घोषणा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अलास्का प्रांताच्या हवाईहद्दीत जवळपास 40 हजार फूट उंचीवर घिरट्या घालणारे ‘अनआयडेंटिफाईड् हाय-अल्टिट्यूड ऑब्जेक्ट’ (युएचएओ) पाडल्याची घोषणा पेंटॅगॉनने केली. हे युएचएओ छोट्या कारच्या आकारा एवढे होते, अशी माहिती पेंटॅगॉनचे माध्यम सचिव ब्रिगेडिअर जनरल पॅट रायडर यांनी दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हद्दीत स्पाय बलून पाठविणाऱ्या चीनवर अमेरिकेने निर्बंध जाहीर केले आहेत.

alaska-balloon-compसर्वात आधी गुरुवारी अलास्काच्या हवाईहद्दीजवळ सदर ‘युएचएओ’ दिसल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाला मिळाली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आदेश मिळाल्यानंतर अलास्काच्या उत्तरेकडील किनारपट्टीजवळून 40 हजार फूट उंचीवरुन प्रवास करणारे सदर युएचएओ भेदण्यात आले. अमेरिकेच्या एफ-22 रॅप्टर लढाऊ विमानाने ही कारवाई केली. हे युएचएओ नेमके काय आहे आणि ते कोणी पाठविले आहे, याची स्पष्टता होऊ शकलेली नाही, असे ब्रिगेडिअर जनरल रायडर यांनी सांगितले.

बरोबर आठवड्यापूर्वी चीनच्या ‘स्पाय बलून’ने अमेरिकेच्या माँटाना प्रांतातून घुसखोरी केली होती. पाच दिवस अमेरिकेच्या हवाईहद्दीतून प्रवास केल्यानंतर अमेरिकेने एफ-22च्या सहाय्याने साऊथ कॅरोलिनाच्या किनारपट्टीजवळ चीनचे हे स्पाय बलून पाडले होते. अमेरिकन क्षेपणास्त्रांच्या साठ्याची हेरगिरी करण्यासाठी चीनने हे स्पाय बलून रवाना केले होते, असे आरोप अमेरिकेतून झाले होते. तर सदर बलून हवामानाचा अभ्यास करण्यासाठी सोडण्यात आले होते व ते दिशा भरकटल्यामुळे अमेरिकेत शिरले, असा अजब दावा चीनने केला होता.

अटलांटिकच्या महासागरात कोसळलेल्या या स्पाय बलूनचे सुटे भाग अमेरिकेच्या नौदलाने ताब्यात घेतले आहेत. सदर बलून आपल्या हवाली करावे, अशी मागणी चीनने केली आहे. तसेच आपले बलून पाडले म्हणून चीनने अमेरिकेला प्रत्युत्तराची धमकी दिली होती. पण त्याआधीच अमेरिकेच्या ‘ब्यूरो ऑफ इंडस्ट्री अँड सिक्युरिटी’ विभागाने संबंधित स्पाय बलूनप्रकरणी चीनच्या सहा कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

दरम्यान, अमेरिका-चीनमधील स्पाय बलूनचा हा वाद सुरू असताना अज्ञात ‘युएचएओ’ने अलास्काच्या हवाईहद्दीजवळून केलेले उड्डाण लक्षवेधी ठरते.

leave a reply