वॉशिंग्टन/मॉस्को – अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रांची संख्या मर्यादित करण्यासंदर्भात रशियाबरोबर केलेल्या ‘न्यू स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रिटी – न्यू स्टार्ट ट्रिटी’ कराराची मुदत पाच वर्षांनी वाढविण्याची घोषणा अमेरिकेने केली. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या घोषणेची माहिती प्रसिद्ध केली. सदर कराराची मुदत पूर्ण होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे रशियाने म्हटले आहे. अमेरिका व रशियातील या कराराचे नाटोने स्वागत केले आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’बाबत चर्चा झाली होती. सदर कराराला पुढील पाच वर्षांसाठी, २०२६ सालापर्यंत मुदतवाढ देण्याविषयी उभय देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी तत्वत: मान्यता दिली होती. येत्या शुक्रवारी, ५ फेब्रुवारी रोजी या कराराची मुदत पूर्ण होणार होती. यासाठी अमेरिका व रशियाने सदर कराराच्या अंमलबजावणीसाठी वेगाने पावले उचलली होती. आत्ताही अमेरिका आणि रशियामध्ये सदर करारातील नियमांमध्ये कुठलेही बदल न करता, तातडीने यावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
या करारानुसार, अमेरिका व रशिया या दोन्ही देशांना प्रत्येकी १,५५०हून अधिक अण्वस्त्रे तसेच ७०० पेक्षा अधिक आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तैनात करण्यास परवानगी नाही. त्याचबरोबर सदर करारांतर्गत उभय देश परस्परांच्या अणुप्रकल्पांची व तळांची पाहणी करू शकतात. अमेरिका व रशियातील सदर करार आपली सुरक्षा ध्यानात घेणारा असल्याचा दावा युरोपिय महासंघ करीत आहे. नाटोने देखील अमेरिका व रशियातील या करारामुळे सदर क्षेत्रात स्थैर्य व शांतता प्रस्थापित होण्यास सहाय्यक ठरेल, असे म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिका व रशियातील या करारामुळे चीन सुखावलेला असेल, असा दावा माध्यमे करीत आहेत. कारण या करारात चीनला देखील सहभागी करून घ्यावे, अशी भूमिका अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली होती. चीनला सहभागी करून घेतल्याशिवाय हा करार पूर्ण होऊ शकत नसल्याचे ट्रम्प म्हणाले होते. मात्र चीनने अमेरिकेची मागणी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली होती. या कराराच्या आड चीनने आपल्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांची संख्या वेगाने वाढविल्याचा आरोप केला जातो.