इराणबरोबरचा अणुकरार वाचविण्यासाठी अमेरिकेकडे कमी आठवडे शिल्लक आहेत

- अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

इराणबरोबरचा अणुकरारवॉशिंग्टन – ‘इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी अमेरिकेकडे फारच कमी आठवडे शिल्लक आहेत. कारण इराण लवकरच अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक साहित्य मिळविण्याच्या अगदी जवळ पोहोचणार आहे. यानंतर इराणने अणुकार्यक्रमात केलेली प्रगती मागे घेणे फारच अवघड ठरेल’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला. त्याचबरोबर अणुकराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटी अपयशी ठरल्या तर अमेरिका वेगळ्या पर्यायांचा विचाार करील, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी बजावले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वर्षांपूर्वी इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेतली होती. तसेच इराणवर कठोर निर्बंध लादले होते. त्यानंतर गेल्या वर्षी अमेरिकेच्या सत्तेवर आलेल्या ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने २०१५ सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी इराणबरोबर नव्याने वाटाघाटी सुरू केल्या होत्या. इराणमध्ये इब्राहिम रईसी यांचे सरकार आल्यानंतर जून महिन्यात पुन्हा या वाटाघाटी थांबल्या होत्या. तर नोव्हेंबर महिन्यात रईसी यांच्या सरकारने व्हिएन्ना येथील चर्चेत सहभाग घेतला.

पण पाच महिन्यांच्या वाटाघाटीनंतरही अणुकरारावर तोडगा निघाला नसल्याची टीका या चर्चेत सहभागी असलेले युरोपिय देश करीत आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून इराणसाठी अणुकराराची खिडकी अवघ्या काही आठवड्यांकरीताच खुली असेल, असे बजावले होते. तर फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री येस ले द्रियान यांनी व्हिएन्ना येथील चर्चा फारच संथगतीने सुरू असल्याची टीका केली होती. अशीच परिस्थिती राहिली तर नियोजित काळात अणुकरार होऊ शकणार नाही, असा इशारा फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला होता.

तर परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी अमेरिकी रेडिओवाहिनीशी बोलताना, अणुकरारासाठी काही आठवडेच शिल्लक असल्याचा इशारा दिला. ब्लिंकन यांचा हा इशारा इराणसाठी नसून अमेरिकेसाठी असल्याचे स्पष्ट होत आहे. हा अणुकरार करण्यासाठी अमेरिकेकडे फार कमी अवधी असल्याचे ब्लिंकन यांनी सांगितले. हा अणुकरार अमेरिकेच्या सुरक्षेसाठी सर्वोत्तम ठरेल, असे ब्लिंकन यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अणुकरारासाठी इराण करीत असलेल्या मागण्यांबाबत लवचिकता दाखविण्याची गरज असल्याचा संदेश परराष्ट्रमंत्री ब्लिंकन अमेरिकेलाच देत असावे, असे समोर येत आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात छुपा अणुकरार झाल्याचा दावा ब्रिटनस्थित अरबी वृत्तसंस्थेने काही दिवसांपूर्वीच केला होता. यानुसार, अमेरिका व इराणमध्ये दोन वर्षांचा अंतरिम अणुकरार झाला असून बायडेन प्रशासन इराणवरील सर्व निर्बंध मागे घेण्यास तयार असल्याचे या बातमीत म्हटले होते. याच्या मोबदल्यात इराण आपल्या अणुप्रकल्पातील प्रगत युरेनियमचा साठा रशियाकडे सोपविणार आहे. पुढच्या काळात अमेरिका या करारातून बाहेर पडली तर इराण सदर साठा मिळवून पुन्हा अणुकार्यक्रम तीव्र करील, ही इराणची शर्त बायडेन प्रशासनाने मान्य केल्याचे या बातमीत म्हटले होते. यानंतर व्हिएन्ना येथील अणुकराराशी आपण बांधिल नसल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी जाहीर केले होते. त्याचबरोबर इराणवर कारवाईसाठी इस्रायल मोकळा असल्याचा इशारा पंतप्रधान बेनेट यांनी दिला होता.

leave a reply