वॉशिंग्टन/येरेवान – अमेरिकी संसदेतील प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी रविवारी आर्मेनियाला भेट दिली. यावेळी आर्मेनियाच्या संसदेला संबोधित करतानाचा पेलोसी यांनी, नवा संघर्ष अझरबैजानने चढविलेल्या हल्ल्यांमुळेच भडकला असून हे हल्ले बेकायदेशीर तसेच घातक असल्याचा आरोप केला. त्याचवेळी आर्मेनियाच्या सार्वभौमत्त्वाला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असून या देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सहाय्य पुरविण्यास अमेरिका वचनबद्ध आहे, अशी ग्वाहीदेखील दिली.
गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री अझरबैजानच्या लष्कराने आर्मेनियावर हल्ले चढविले. त्यानंतर पुढील दोन दिवस आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमांवर जोरदार संघर्ष सुरू होता. त्यानंतर ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएसटीओ’ या रशियापुरस्कृत संघटनेचे पथक आर्मेनियात दाखल झाले होते. या संघटनेत आर्मेनियाचा समावेश आहे. अझरबैजानने संघर्ष न थांबविल्यास ‘सीएसटीओ’च्या सदस्य देशांचे लष्कर आर्मेनियात दाखल होऊ शकते, असे संकेत देण्यात आले होते. या इशाऱ्यानंतर रशियाच्या मध्यस्थीने संघर्षबंदी करण्यात आली.
संघर्षबंदीनंतर दोन्ही देशांनी लष्करी हानीची माहिती जाहीर केली. त्यानुसार अझरबैजानचे ७७ जवान ठार झाले असून २८२ जवान जखमी झाले आहेत. तर आर्मेनियाच्या १३५ जवानांचा बळी गेला असून जखमींची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. अझरबैजानविरोधातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाने घेतलेल्या भूमिकेमुळे आर्मेनियातून नाराजीचे सूर उमटत आहेत. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी सभापतींनी शिष्टमंडळासह आर्मेनियाला दिलेली भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.
पेलोसी यांनी आपल्या दौऱ्यात आर्मेनियाच्या संसदेसह अमेरिकी दूतावासाला भेट दिली. आर्मेनियाच्या संसदेत केलेल्या भाषणात त्यांनी अझरबैजानवर जोरदार टीकास्त्र सोडले. नव्या संघर्षासाठी अझरबैजानने केलेले हल्लेच कारणीभूत असल्याचा उघड आरोप करून याची नोंद झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. अझरबैजानच्या या कृत्याचा अमेरिका तीव्र शब्दात निषेध करीत असून आर्मेनियाच्या सार्वभौमत्त्वाला अमेरिकेचे समर्थन आहे, अशी ग्वाही पेलोसी यांनी दिली. त्याचवेळी आर्मेनियाच्या नेतृत्त्वाबरोबर अमेरिकेची बोलणी सुरू असून त्यांच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आर्मेनिया व रशियामधील सहकार्याचा उल्लेख करताना यावेळी झालेल्या संघर्षानंतर आर्मेनियाला रशियाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. आर्मेनियातील लोकशाही टिकावी यासाठी अमेरिका निश्चितच प्राधान्य देईल, असेही पेलोसी यांनी यावेळी सांगितले. आर्मेनिया हा रशियाच्या प्रभावाखाली असलेला देश म्हणून ओळखण्यात येतो. २०१८ साली या देशात ‘वेल्व्हेट रिव्होल्युशन’च्या माध्यमातून सत्ताबदल घडून आला होता. त्यानंतर तीनदा आर्मेनिया व अझरबैजानमध्ये मोठा संघर्ष भडकला असून या देशावरील रशियाचा प्रभाव कमी होत चालल्याचे दावे करण्यात येतात.