चीन, उत्तर कोरियाच्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका-जपानचा ‘रिसायलंट शिल्ड’ युद्धसराव

टोकिओ – अमेरिका आणि जपानच्या संरक्षणदलांमध्ये पाच दिवसांचा युद्धसराव सुरू झाला आहे. चीन आणि उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर सदर युद्धसरावाचे आयोजन केल्याची माहिती अमेरिकेने दिली. हा युद्धसराव सुरू होण्याच्या काही तास आधी चीनने जपानच्या सेंकाकूच्या जवळ दोन गस्तीनौका रवाना केल्या होत्या. त्यानंतर हा युद्धसराव सुरू झाल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

जपानमध्ये मुख्यालय असलेल्या अमेरिकेचे सातवे आरमार आणि जपानच्या नौदलामध्ये सोमवारपासून ‘रिसायलन्ट शिल्ड 2021’ वार्षिक युद्धसराव सुरू झाला आहे. या पाच दिवसांच्या युद्धसरावात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिका व जपानचे जवळपास 77 कमांड सेंटर्स सहभागी झाले आहेत. शत्रूच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना उत्तर देण्यासाठी सदर युद्धसराव आवश्यक असल्याचे अमेरिकेच्या नौदलाने स्पष्ट केले. त्याचबरोबर या युद्धसरावामुळे अमेरिका व जपानच्या नौदलातील समन्वय, संपर्क अधिक मजबूत होईल, असा विश्‍वासही अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केला.

या युद्धसरावाच्या काही तास आधी चीनच्या गस्तीनौकांनी जपानच्या सेंकाकू द्विपसमुहाच्या हद्दीत घुसखोरी केली होती. शनिवार आणि रविवार, असे सलग दोन दिवस चिनी गस्तीनौकांनी सेंकाकूजवळ धडक मारली होती. जपानच्या तटरक्षकदलाने वेळीच खबरदारी घेऊन चीनच्या गस्तीनौकांना पिटाळून लावले. पण गेल्या दहा दिवसात चीनने तिसर्‍यांदा जपानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली आहे. सेंकाकू हा आपलाच द्विपसमुह असल्याचा दावा चीन करीत आहे.

सेंकाकूच नाही तर तैवान व ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रातील स्प्रार्टले, पॅरासेल, स्कारबोरो या बेटांवर देखील चीन अधिकार सांगत आहे. तैवान आपला अविभाज्य भूभाग असल्याचे सांगून चीनने या देशाच्या हवाईहद्दीतील आपल्या विमानांची घुसखोरी वाढविली आहे. गेल्या दहा दिवसात चीनच्या विमानांची तैवानच्या हद्दीतील पाचवेळा घुसखोरी केली. यामुळे या संपूर्ण सागरी व हवाई क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, ‘ईस्ट व साऊथ चायना सी’मधील चीनच्या आक्रमकतेला आव्हान देण्यासाठी फ्रान्स, ब्रिटन या देशांनी आपल्या युद्धनौका रवाना करण्याची घोषणा केली आहे. यामुळे चीन संतापला असून पाश्‍चिमात्य देशांनी आपल्या सागरी क्षेत्रात लुडबूड करू नये, अशा धमक्या चीन देत आहे.

leave a reply