इस्रायल-सौदी सहकार्याला चालना देण्यासाठी अमेरिकेतील ज्यूवंशियांच्या शिष्टमंडळाची सौदीला भेट

सौदीला भेटरियाध/वॉशिंग्टन – सौदी अरेबिया व इस्रायलमधील सहकार्य वाढून दोन देशांमधील संबंध सुरळीत व्हावेत यासाठी अमेरिकेच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच सौदीला भेट दिली. या शिष्टमंडळात अमेरिकेतील ज्यूवंशिय उद्योजक व नेत्यांचा समावेश होता. दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी सौदीला भेट दिली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात इस्रायल व सौदीमध्ये विमानसेवा सुरू झाली होती.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या पुढाकारानंतर इस्रायल व अरब देशांमध्ये सहकार्य वाढत आहे. आतापर्यंत युएई, बाहरिन, सुदान व मोरोक्को या चार अरब देशांनी इस्रायलबरोबर ऐतिहासिक अब्राहम करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. इतर अरब देशांबरोबरही बोलणी सुरू असली तरी सौदी अरेबियाबरोबरील संबंध सुरळीत करण्यासाठी इस्रायल व अमेरिका विशेष प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊन खळबळ उडविली होती. ही भेट अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत झाल्याचे सांगण्यात येते.

सौदीला भेटअमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व त्यांचे प्रशासन मात्र इस्रायल-सौदी सहकार्यासाठी फारसे उत्सुक नसल्याची टीका विरोधकांकडून होत होती. इस्रायलमधूनही अमेरिकेच्या सौदीबाबतच्या धोरणावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर, बायडेन प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे अमेरिकी शिष्टमंडळाच्या भेटीवरून दिसून येत आहे. अमेरिकी शिष्टमंडळात २० जणांचा समावेश असून ही भेट सौदीच्या निमंत्रणावरून असल्याची माहिती देण्यात आली.

इस्रायलचे माजी पंतप्रधान नेत्यान्याहू यांचे निकटवर्तिय म्हणून ओळखण्यात येणारे अमेरिकी उद्योजक फिल रोसेन शिष्टमंडळात सहभागी आहेत. या शिष्टमंडळाने सौदी अरेबियातील सहा मंत्री तसेच राजघराण्यातील प्रतिनिधींची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘सौदीची राजवट सौदीला भेटआपल्या नागरिकांना इस्रायलबरोबरील सहकार्यासाठी तयार करीत आहे. इस्रायल ही एक क्षेत्रिय सत्ता आहे व त्याच्याकडे इराण या समान शत्रूविरोधात लढण्याची क्षमता आहे याची जाणीव सौदीला झाली आहे. अशा स्थितीत येत्या काही महिन्यात किंवा वर्षभरात दोन देशांमधील संबंध सुरळीत ःझाले तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे नसेल’, अशा शब्दात रोसेन यांनी सौदी दौर्‍याबाबत भूमिका स्पष्ट केली.

अब्राहम करारात सामील होण्यासाठी सौदीची राजवट अमेरिकेबरोबर गोपनीय पातळीवर चर्चा करीत असून युएई व बाहरिनबरोबरील करारही सौदीच्या होकारानंतरच झाले आहेत, असा दावाही अमेरिकी उद्योजकांनी केला. काही दिवसांपूर्वीच, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅरेड कश्‍नर यांनी बायडेन प्रशासन अब्राहम कराराबाबत सक्रीय नसल्याची टीका केली होती. तर माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, इराणविरोधातील धोरण आक्रमक केले तर इस्रायलबरोबरील संबंध सुरळीत करु अशी अट सौदी अरेबियाने अमेरिकेसमोर ठेवल्याचा दावा केला होता.

leave a reply