वॉशिंग्टन – शत्रूदेश किंवा दहशतवाद्यांनी चढविलेले स्वार्म ड्रोन्सचे हल्ले भेदण्यासाठी अमेरिकेच्या लॉकहिड मार्टिन कंपनीने पर्याय दिला आहे. हल्लेखोर ‘स्वार्म ड्रोन्स’ आपले मायक्रोवेव्ह एनर्जीने सज्ज असलेले ड्रोन नष्ट करील, असा दावा या अमेरिकन कंपनीने केला आहे. काही दिवसांपूर्वी लॉकहिड मार्टिन कंपनीने आपल्या या मायक्रोवेव्ह एनर्जीने सज्ज असलेल्या ड्रोनची चाचणी केली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये टेहळणीसाठी वापरले जाणारे आणि हल्लेखोर ड्रोन्सचा वापर वाढू लागला आहे. पण येत्या काही वर्षात हे ड्रोन्स कालबाह्य ठरून त्यांची जागा स्वार्म ड्रोन्स घेतील, असा दावा केला जातो. सध्या अमेरिकेव्यतिरिक्त रशिया आणि चीनने स्वार्म ड्रोन्सचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
गेल्या वर्षी अमेरिकेबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीनने स्वार्म ड्रोन्सची चाचणी घेतली होती. इतर देशही स्वार्म ड्रोन्सचे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. तर आघाडीच्या दहशतवादी संघटना देखील स्वार्म ड्रोन्सच्या सज्जतेकडे पावले टाकत असल्याचा इशारा दिला जातो.
अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरणार्या स्वार्म ड्रोन्सना नष्ट करणारे ड्रोन विकसित केल्याचा दावा लॉकहिड मार्टिनने केला आहे. अमेरिकेच्या संरक्षणसाहित्यांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या लॉकहिड मार्टिन कंपनीने काही दिवसांपूर्वी ‘मॉर्फियस’ची चाचणी घेतली.
स्वार्म ड्रोन्सच्या धोक्याला मॉर्फियस हे योग्य उत्तर ठरेल, असे अमेरिकन कंपनीने म्हटले आहे. उच्च शक्तीच्या मायक्रोवेव्ह एनर्जीचा वापर असलेले मॉर्फियस सेकंदांमध्ये स्वार्म ड्रोन्सना नष्ट करू शकत असल्याचा दावा या कंपनीने केला.
साधारण सहा इंच आकाराचे मॉर्फियस ड्रोन लॉंचरमध्ये बसविता येते. त्यामुळे लढाऊ विमाने, लष्करी वाहने किंवा लष्करी तळावरुन मॉर्फियस ड्रोन प्रक्षेपित करता येईल, अशी माहिती या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी ब्रायन डन यांनी दिली.
अवघ्या १४ किलोग्रॅम वजानचे मॉर्फियस पुन्हा वापरता येऊ शकतात. त्यामुळे या ड्रोनवरील खर्चही कमी होत असल्याचा दावा केला जातो. मॉर्फियस ड्रोनमधून उत्सर्जित होणार्या मायक्रोवेव्ह एनर्जीच्या क्षमतेबाबत अधिक माहिती लॉकहीड मार्टिन या कंपनीने उघड केलेली नाही.