अमेरिकेतील निर्वासितांच्या संकटाची तीव्रता वाढली

- बायडेन यांच्या कारकिर्दीत सुमारे ५० लाख अवैध निर्वासित घुसल्याचा स्वयंसेवी संस्थेचा दावा

निर्वासितांच्या संकटाची तीव्रतावॉशिंग्टन – अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांच्या संकटाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केले असून, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कारकिर्दीत सुमारे ५० लाख अवैध निर्वासित अमेरिकेत घुसल्याचा दावा केला. त्याचवेळी बायडेन प्रशासनाकडून अवैध निर्वासितांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी अमेरिकी करदात्यांचे २० अब्ज डॉलर्स उधळले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका-मेक्सिको सीमेवरील टेक्सास व फ्लोरिडासारख्या राज्यांनी आपल्याकडील निर्वासित राजधानी वॉशिंग्टन, शिकागो तसेच मॅसेच्युसेट्स यासारख्या डेमोक्रॅट्सची सत्ता असलेल्या भागांमध्ये पाठविण्यास सुरुवात केल्याचे समोर येत आहे.

मेक्सिकोतून अमेरिकेत घुसखोरी करणारे निर्वासित ही अमेरिकेतील प्रमुख समस्यांपैकी एक असून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड म्प यांनी त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले होते. मात्र म्प यांचे निर्णय रद्दबातल ठरवून बायडेन यांनी निर्वासितांना मोकळीक देण्यास सुरुवात केली आहे. बायडेन प्रशासनाच्या धोरणांमुळे निर्वासितांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू केली असून दर महिन्याला निर्वासितांचे नवे विक्रम रचले जात आहेत. या अवैध निर्वासितांमुळे अमेरिका-मेक्सिको सीमेवरील राज्यांमध्ये आणीबाणीची स्थिती उद्भवली आहे. मात्र तरीही बायडेन प्रशासन या मुद्याकडे गांभीर्याने पहात नसून सर्व काही आलबेल असल्याची वक्तव्ये सातत्याने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन फॉर अमेरिकन इमिग्रेशन रिफॉर्म’(फेअर) या स्वयंसेवी गटाने निर्वासितांसंदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर आणून संकटाच्या तीव्रतेबाबत जाणीव करून दिली.

निर्वासितांच्या संकटाची तीव्रता‘फेअर’ने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेत ४९ लाखांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरी केली आहे. यातील सुमारे नऊ लाख अवैध निर्वासित अमेरिकी यंत्रणांची नजर चुकवून देशात दाखल झाले असून त्याबद्दल प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तर गेल्या १७ महिन्यात अमेरिकेत दर महिन्याला दीड लाखांहून अधिक निर्वासित घुसखोरी करीत आहेत. बायडेन प्रशासनाने विविध कारणे पुढे करून अमेरिकेत मोकळ्या सोडलेल्या निर्वासितांची संख्या पाच लाखांवर जाऊन पोहोचली आहे.

निर्वासितांच्या संकटाची तीव्रतानिर्वासितांना अमेरिकेत मुक्त प्रवेशद्वार देतानाच त्यांच्यावर अमेरिकी जनतेचे अब्जावधी डॉलर्स उधळले जात असल्याचेही उघड झाले. बायडेन प्रशासन दरवर्षी अवैध निर्वासितांवर २० अब्ज डॉलर्सहून अधिक निधी उधळत असल्याचा आरोप ‘फेडरेशन फॉर अमेरिकन इमिग्रेशन रिफॉर्म’ने केला. निर्वासितांच्या राहण्याच्या सोयीसह आरोग्यविषयक सुविधा तसेच शिक्षण व इतर गोष्टींवर हा निधी खर्च होत असल्याचे स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. अमेरिकी जनता महागाईत होरपळत असतानाच निर्वासितांवरील ही उधळपट्टी अन्याय्य असल्याची टीका ‘फेअर’ने केली.

दरम्यान, निर्वासितांच्या लोंढ्यांना तोंड देणाऱ्या अमेरिका-मेक्सिको सीमेवरील राज्यांनी आपल्याकडील निर्वासित डेमोक्रॅटस्‌‍ पक्षाची सत्ता असलेल्या भागांमध्ये पाठविण्यास सुरुवात केली आहे. टेक्सास प्रांताने नुकत्याच १०० निर्वासितांनी भरलेल्या दोन बस थेट राजधानी वॉशिंग्टनमध्ये पाठविल्याचे समोर आले. तर फ्लोरिडा प्रांताने व्हेनेझुएलातून आलेल्या ५० निर्वासितांना थेट विमानाने मॅसेच्युसेट्स प्रांतातील ‘मार्थाज्‌‍ विनयार्ड’ या शहरात धाडल्याचे उघड झाले. टेक्सास प्रांतातून यापूर्वी शिकागो शहरातही निर्वासितांचा लोंढा पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे.

leave a reply