अमेरिकेने दुसऱ्या साथीसाठी तयार रहावे

- राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘नवी साथ येत आहे. या नव्या साथीचा मुकाबला करण्यासाठी अतिरिक्त तरतूदीची तयारी करावी’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. याआधी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापेक्षाही भयानक साथ येईल, असे बजावले होते. तर गेल्या काही आठवड्यांपासून काही देशांमध्ये पसरत असलेली मंकिपॉक्स ही नवी मोठी साथ असल्याचे ‘वर्ल्ड हेल्थ नेटवर्क’ने बजावले आहे.

कोरोनाविरोधी मोहिमेत अमेरिकेला मिळालेल्या यशाबाबत माध्यमांशी बोलत असताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी नव्या साथीचा इशारा दिला. आपल्याला भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील, असेही बायडेन पुढे म्हणाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. पण बायडेन यांच्या या विधानांनी अमेरिकेसह जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने काही आठवड्यांपूर्वी नव्या साथीचा इशारा दिला होता. ही नवी साथ कोरोनापेक्षाही घातक असेल, असे आरोग्य संघटनेने बजावले होते. त्यानंतर ब्रिटन व काही देशांमध्ये मंकीपॉक्स या साथीने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे मंकीपॉक्स ही ती नवी साथ आहे का, असे प्रश्नही विचारण्यात आले होते. त्यावेळी आरोग्य संघटनांनी हे दावे फेटाळले होते.

पण ‘वर्ल्ड हेल्थ नेटवर्क-डब्ल्यूएचएन’ या संघटनेने मंकीपॉक्स हीच नवी साथ असल्याचा दावा केला आहे. 58 देशांमध्ये या साथीचे 3,417 रुग्ण आहेत. सदर साथीचा वेगाने फैलाव होत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. वेळीच आंतरराष्ट्रीय समुदायाने ही साथ रोखण्यासाठी पावले उचलली नाही तर, त्याचे भीषण परिणाम होतील, असा इशारा ‘डब्ल्यूएचएन’ने दिला आहे. येत्या काही तासात जागतिक आरोग्य संघटनेची बैठक सुरू होत आहे. त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि ‘डब्ल्यूएचएन’ने हा इशारा दिला आहे.

leave a reply