वॉशिंग्टन – गेल्या दीड वर्षापासून सौदी अरेबियाबरोबर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार येत्या काही तासात सौदीसाठी रवाना होतील. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही आठवड्यांमध्ये सौदीने इराणबरोबर सहकार्य प्रस्थापित केले आहे. तसेच इंधनाच्या उत्पादनातील कपातीचा लक्षवेधी निर्णय घेतला आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या बायडेन प्रशासनाने सुलिवन यांना सौदीला धाडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
येत्या शनिवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन सौदीसाठी रवाना होतील. यावेळी उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य तसेच सुरक्षाविषयक धोरणांवर चर्चा होणार असल्याचा दावा केला जातो. सुलिवन यांनी अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर निअर ईस्ट पॉलिसी’ या अभ्यासगटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. या चर्चेत कोणत्या मुद्यांना संबोधित करणार असल्याचे तपशील सुलिवन यांनी जाहीर करण्याचे टाळले. पण इराण किंवा इतर कुठल्याही मुद्यापेक्षा इंधनाच्या उत्पादनातील कपातीबाबत सौदीने घेतलेल्या निर्णयावर सुलिवन चर्चा करतील, असा दावा केला जातो.
इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत बायडेन प्रशासनाने स्वीकारलेल्या भूमिकेमुळे अमेरिकेने सौदी व अरब मित्रदेशांचा विश्वास गमावल्याचे आरोप अमेरिकेत होत आहेत. यानंतरही बायडेन प्रशासन इराणबाबतची आपली भूमिका बदलण्यास तयार नाही. याउलट राजकीय वाटाघाटीने इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा सुटू शकतो, असा दावा बायडेन प्रशासन करीत आहे. त्यामुळे इराणच्या मुद्यावर सुलिवन सौदीच्या क्राऊन प्रिन्सबरोबर चर्चा करणार नाही, असे अमेरिकेतील विश्लेषकांचे म्हणणे आहे.
त्याऐवजी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सौदीबरोबर रशिया-युक्रेन युद्ध व इंधनाच्या उत्पादनातील कपात या मुद्यावर अधिक चर्चा करतील, असा दावा अमेरिकन वृत्तवाहिन्या व विश्लेषक करीत आहेत. सौदीने इंधनाच्या उत्पादनात कपात कमी करण्याविषयी घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा, असे सुलिवन सौदीला सुचवतील, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सुलिवन यांच्या सौदीतील बैठकीमध्ये भारत आणि युएईचे प्रतिनिधी देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हिंदी