मॉस्को – रशिया युक्रेनवर आक्रमणाच्या तयारीत असल्याचा अमेरिका व नाटो करीत असलेला आरोप, रशियाने पुन्हा एकदा धुडकावला आहे. आम्हाला युद्ध नको, आम्हाला युद्धाची गरजच नाही, असे रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे प्रमुख निकोलाय पत्रुशेव्ह यांनी म्हटले आहे. नाटो युक्रेनला आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. नाटोच्या या हालचाली सुरक्षेसाठी असल्याचे कुणीही मान्य करणार नाही, असा ठपका रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी ठेवला आहे.
रशिया कुठल्याही क्षणी युक्रेनवर हल्ला चढविल, असे इशारे अमेरिकेकडून सातत्याने दिले जात आहेत. नाटोकडूनही रशियावर असे आरोप होत असून याचे गंभीर परिणाम होतील, असे अमेरिका व नाटो रशियाला बजावत आहेत. या प्रश्नावर ब्रिटनने देखील आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. रशियाच्या आक्रमकतेपासून युरोपचे रक्षण करण्यासाठी ब्रिटन सैन्य तैनात करण्यास तयार आहे, असे सांगून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यासंदर्भात नाटोला प्रस्ताव दिला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी युक्रेनचा प्रश्नावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखविली होती. त्या पार्श्वभूमीवर, त्यांनी नाटोला दिलेला हा प्रस्ताव लक्षवेधी ठरतो.
मात्र अमेरिका तसेच नाटोकडून रशिया युक्रेनवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप म्हणजे हास्यास्पद बाब असल्याची टीका रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे प्रमुख निकोलाय पत्रुशेव्ह यांनी केली. या आरोपात अजिबात तथ्य नाही. रशियाला युद्ध नको आहे आणि रशियाला युद्धाची गरजही नाही, असे पत्रुशेव्ह पुढे म्हणाले. तर रशियाच्या आक्रमणाची शक्यता वर्तवून नाटो युक्रेनला आपल्या गटात ओढू पाहत असल्याचे रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी म्हटले आहे. याबरोबरच युक्रेन नाटोमध्ये सहभागी होण्यास तयार नसल्याचा दावाही लॅव्हरोव्ह यांनी केला.
सुरक्षेसाठी युक्रेनला नाटोत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न कुणालाही पटणारे नाहीत. युक्रेनला नाटोत सहभागी करणे म्हणजे संरक्षणासाठी घेतलेला निर्णय असूच शकत नाही, असे सांगून रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नाटोच्या इतिहासाची उजळणी केली. १९९९ साली नाटोने युगोस्लाव्हियामध्ये जवळपास तीन महिने बॉम्ब हल्ले चढविले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन करून लिबियावर हल्ला चढविला होता. अफगाणिस्तानात नाटोने काय केले ते सर्वांनाच ठाऊक आहे, असे सांगून रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपला देश नाटोवर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचा संदेश दिला आहे.
दरम्यान, युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिल्यानंतर रशियाने एक लाखाहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेवर आणून ठेवले आहेत. यानंतर रशिया युक्रेनवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप अमेरिका व नाटोकडून केला जात आहे. पण ही तैनाती सुरक्षेसाठी असल्याचे सांगून रशिया सातत्याने अमेरिका-नाटोचे आरोप धुडकावत आहे. मात्र युक्रेन नाटोत सहभागी झाला तर ती युद्धाची घोषणा मानली जाईल, असा सज्जड इशारा रशियाने आधीच दिलेला आहे. अमेरिका व ब्रिटन हे देश रशियाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, फ्रान्स आणि जर्मनी हे नाटोचे सदस्यदेश मात्र रशियाच्या विरोधात जाण्यास तयार नाहीत. जर्मनीने तर युक्रेनला रशियाच्या विरोधात शस्त्रास्त्रे पुरविण्यास नकार दिला आहे. यामुळे युक्रेनच्या प्रश्नावर नाटोमध्येच गंभीर मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी युक्रेनच्या प्रश्नावर नको तितकी आक्रमक भूमिका घेणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर अमेरिकेतूनच टीका होत असल्याचे दिसत आहे.