तेहरान/बगदाद – अमेरिका व पाश्चिमात्य देशांबरोबरील अणुकरार पूर्णत्त्वाला जात असल्याच्या घोषणा इराणकडून केल्या जात आहेत. तरीही आपला अमेरिकेवर विश्वास नसल्याचे इराण वेळोवेळी बजावत असल्याचे दिसते. इराकचे राष्ट्राध्यक्ष बरहाम सलिह यांच्याबरोबरील फोनवरील चर्चेत इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी अमेरिकेवर विश्वास ठेवणे शक्य नसल्याचा निर्वाळा दिला. अमेरिकेला इस्लामधर्मिय देशांबद्दल अजिबात दयामाया नाही, विशेषतः इराकी जनतेबद्दल अमेरिकेला काहीच वाटत नाही, असे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी या चर्चेत बजावले.
इराकचे स्थैर्य व सुरक्षेला इराणचा पूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाही यावेळी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली. त्याचवेळी इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी यांनी अमेरिकेबाबत दिलेल्या इशार्याची आठवण राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी त्यांच्याच शब्दात करून दिली. काहीही झाले तरी अमेरिका इस्लामधर्मिय देशांबाबत अजिबात दयामाया दाखविणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष रईसी म्हणाले. विशेषतः इराकी जनतेची अमेरिका कधीही पर्वा करणार नाही, असा इशाराही त्यांनी इराकच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरील या चर्चेत दिला.
अमेरिका व इस्रायलशी सहकार्य करणारे आखाती देश आपल्या देशहिताशी तडजोड करीत असल्याचा ठपका देखील यावेळी राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ठेवला. इराकचे राष्ट्रध्यक्ष बरहाम सलिह यांनीही इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या टीकेला दुजोरा दिला. या क्षेत्रासाठी इराण हा अत्यंत महत्त्वाचा देश ठरतो. या क्षेत्राच्या स्थैर्य व सुरक्षेसाठी इराणची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे राष्ट्राध्यक्ष सलिह यावेळी म्हणाले. इराण व इराकचे सहकार्य या क्षेत्रासमोर खड्या ठाकलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा दावाही इराकच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला.
दरम्यान, अमेरिका व इराणमधील अणुकरार लवकरच नव्याने संपन्न होईल, असे दावे दोन्ही देशांकडून केले जात आहेत. सध्या अमेरिकेचे बायडेन प्रशासन आखातातील देशांना इराणबरोबरील अणुकराराची आवश्यकता पटवून देण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी नुकतीच इस्रायलला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी इराणच्या अणुकरारावरून इस्रायलसह आखाती देशांनाही आश्वस्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र त्यांना यश मिळालेले नाही.
अमेरिका इराणबरोबरील अणुकराराची अशारितीने वकिली करीत असताना, इराण मात्र अमेरिका विश्वासघात करणारा देश असल्याचे उघडपणे सांगत आहे. ही बाब या क्षेत्रातील अविश्वास, अस्थैर्य आणि अनिश्चिततेवर अधिक प्रकाश टाकणारी ठरते.