इराणबरोबरील अणुकराराला अमेरिकेच्या सत्ताधारी पक्षातूनच कडवा विरोध

अणुकरारालावॉशिंग्टन – अंतिम टप्प्यात पोहोचलेला इराणबरोबरचा अणुकरार पूर्णत्वास नेण्यासाठी बायडेन प्रशासनाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इस्रायल व आखाती देशांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण आता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षातूनच या अणुकराराला असलेला विरोध तीव्र झाला आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या १८ संसद सदस्यांनी इराणबरोबरील संभाव्य करार अतिशय चिंताजनक ठरेल, असे बजावले आहे. याबाबत अधिक काळ शांत राहणे योग्य ठरणार नाही, असे सांगून या १८ जणांनी अणुकराराला विरोध केला.

चार दिवसांपूर्वी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या ‘फॉरिन अफेअर्स कमिटी’मधील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इराणबरोबरील अणुकराराच्या विरोधात पत्रकार परिषद संबोधित केली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर निर्बंध लादून इराणवर दबाव कायम ठेवला होता. पण बायडेन प्रशासनाची भूमिका चुकीच्या अणुकराराला प्रोत्साहित करणारी असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाचे नेते अँडी बार यांनी केली होती.

रिपब्लिकन पक्षाने केलेल्या विरोधाला काही तास उलटत नाही तोच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षातूनही अणुकराराच्या विरोधातील आवाज तीव्र होऊ लागला आहे. १८ डेमोक्रॅट सदस्यांनी जाहीरपणे बायडेन प्रशासनाकडून अणुकरारासाठी सुरू असलेल्या हालचालींना विरोध केला. जोश गॉथिमेर, एलेन लुरिया, डोनाल्ड नॉरक्रॉस, डिन फिलिप्स आणि युआन वर्गास या सिनेटर्सनी पत्रकार परिषद घेऊन इराणबरोबरच्या अणुकराराला विरोध केला. तर आणखी १३ लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरुपात या करारावर आक्षेप नोंदविले. व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये इराणने आपल्या लष्कराच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स पथकाला दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती. बायडेन प्रशासन यासाठीही तयार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर डेमोक्रॅट पक्षाचे सदस्यच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर संताप व्यक्त करीत आहेत. इराणच्या सर्वात निर्दयी, क्रूर मानल्या जाणार्‍या रिव्होल्युशनरी गार्डस्ना दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय कधीही स्वीकारला जाणार नसल्याचे गॉथिमेर यांनी ठणकावले आहे.

‘जुन्या अणुकरारामुळे इराणचा अणुकार्यक्रम थांबला नव्हता. नवा अणुकरार देखील इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखू शकणार नसेल, तर त्याची आवश्यकताच नाही’, असे एलेन लुरिया यांनी म्हटले आहे. या अणुकराराला विरोध करणार्‍या डेमोक्रॅट पक्षाच्या संसद सदस्यांची संख्या सध्या १८वर असली तरी त्यात वाढ होऊ शकते, असे दावे केले जात आहेत.

बायडेन यांच्या पक्षातील वरिष्ठ सिनेटर्स या अणुकरारावर खूश नसल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत. त्यामुळे अमेरिकन सिनेट व कॉंग्रेसमध्ये इराणबरोबरचा हा अणुकरार पारित होणे अवघड असल्याचे अमेरिकन माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, बायडेन प्रशासन नव्या अणुकरारासाठी हालचाली तीव्र करीत असताना, इराणने नातांझ अणुप्रकल्पातील सेंट्रिफ्यूजेस इस्फाहन येथील अणुप्रकल्पात हलविल्याचा दावा केला जातो. नातांझ अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या देखरेखीखाली येतो. तर इस्फाहन अणुप्रकल्प आयोगाने आपल्या निरिक्षणातून वगळला आहे. याचा फायदा घेऊन इराणने नातांझ अणुप्रकल्पातील सेंट्रिफ्यूजेस इस्फाहन येथे नेल्याच्या बातम्या येत आहेत.

ही बाब देखील अणुकराराचे समर्थन करणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अडचणीत टाकणारी ठरू शकते. त्याचवेळी इस्रायलसह अमेरिकेचे आखातातील इतर मित्रदेश अणुकराराच्या मुद्यावर अमेरिकेच्या विरोधात गेल्याचे दिसत आहे. त्याचे फार मोठे दडपण बायडेन प्रशासनावर आले आहे. अशा परिस्थितीत अणुकराराला विरोध करणार्‍या स्वपक्षीय लोकप्रतिनिधींमुळे बायडेन प्रशासनासमोरील आव्हान तीव्र बनले आहे.

leave a reply