अमेरिका सिरियाच्या इंधनावर दरोडा टाकत आहे

- सिरियाच्या पेट्रोलियम मंत्र्यांचा आरोप

दमास्कस – सिरियाच्या इंधनक्षेत्राचा ताबा घेऊन एखाद्या दरोडेखोरासारखी अमेरिका इंधनाची लूट करीत आहे, असा आरोप सिरियाच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी केला. सिरियातील गृहयुद्धाचा लाभ घेऊन अमेरिकेने हे सारे घडवून आणले आहे. आत्तापर्यंत अमेरिकेने सुमारे ९२ अब्ज डॉलर्स इतके सिरियाचे इंधन लुटले असून सिरियाच्या सुमारे ९० टक्के इतक्या इंधनक्षेत्रातून दरदिवशी एक लाख, ४० हजार बॅरल्स इतके इंधन पळविले जात आहे, असे पेट्रोलियम मंत्री बसाम तोमाह यांनी म्हटले आहे.

सिरियातील गृहयुद्धाला दहा वर्षे पूर्ण झाली. या काळात सिरियात घनघोर संघर्ष सुरू झाला व अजूनही हा संघर्ष थांबलेला नाही. यामुळे झालेल्या रक्तपात व अस्थैर्याचे भीषण परिणाम सिरियाला भोगावे लागत आहेत. आयएस सारख्या खतरनाक दहशतवादी संघटनेने सिरियात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. तर राष्ट्राध्यक्ष बाशर अल अस्साद यांच्या राजवटीला आव्हान देणार्‍या बंडखोरांनी सिरियाच्या मोठ्या भूभागाचा ताबा घेतला होता. सिरियन कुर्दांच्या सशस्त्र संघटना स्वातंत्र्यासाठी लढा देत असून एकाच वेळी या संघटना सिरियन लष्कर व आयएसच्या दहशतवाद्यांशीही संघर्ष करीत आहेत. सिरियाच्या ईशान्येकडे असलेल्या इंधनप्रकल्पांचा ताबा कुर्द बंडखोरांकडेच आहे.

या कुर्द बंडखोरांमागे अमेरिका असल्याचा आरोप सिरियाने अनेकवार केला होता. पण आता सिरियन पेट्रोलियम मंत्री बसाम तोमाह यांनी अमेरिकेवर थेट आरोप करून हा देश सिरियाच्या इंधनावर दरोडा टाकत असल्याचा ठपका ठेवला आहे. आत्तापर्यंत अमेरिकेने सिरियाचे सुमारे ९२ अब्ज डॉलर्स इतक्या रक्कमेचे इंधन पळवल्याचे सांगून तोमाह यांनी यासाठीच अमेरिकेने सिरियात गृहयुद्ध भडकावल्याचे संकेत दिले. २०१९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियाच्या इंधनक्षेत्रावर अमेरिकेचे नियंत्रण असणे आवश्यक असल्याचा दावा केला होता. अन्यथा हे इंधन दहशतवाद्यांच्या हाती सापडेल आणि त्याचे भयंकर परिणाम समोर येतील, असा दावा ट्रम्प यांनी केला होता.

तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सिरियाच्या इथल्या इंधनक्षेत्राजवळच विमानतळ उभारून इथे लष्कराच्या तैनाती करण्यावर काम सुरू केले आहे. यामुळे सिरियाच्या इंधनक्षेत्राबाबतचे अमेरिकेचे धोरण इतक्यात तरी बदलण्याची शक्यता नसल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकाच नाही तर तुर्कीचा देखील सिरियाच्या इंधनक्षेत्रावर डोळा असून कुर्द बंडखोरांवर कारवाई करण्याच्या नावाखाली तुर्की या क्षेत्राचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे समोर आले होते. सिरियात कुर्दांच्या संघटना आणि तुर्कीसंलग्न संघटना व तुर्कीच्या लष्कराच्या सुरू असलेल्या संघर्षामागे देखील इथले इंधन हेच प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.

leave a reply