बीजिंग – नाटोच्या युरोपातील विस्तारवादी धोरणाइतकेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेची धोरणे खतरनाक आहेत. इथे गट-तट उभे करून अमेरिका या क्षेत्राचे विभाजन घडवून आणत आहे. यावर नियंत्रण ठेवले नाही, तर ती अतिशय धोकादायक बाब बनेल. अमेरिकेच्या या इंडो-पॅसिफिकविषयक धोरणाचे भयंकर परिणाम संभवतात, अशी धमकी चीनचे उपपरराष्ट्रमंत्री ली युचेंग यांनी दिली आहे. रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याला नाटोचे विस्तारवादी धोरणे जबाबदार असल्याचा ठपका युचेंग यांनी ठेवला. त्याच धर्तीवर पुढच्या काळात चीनने तैवानवर हल्ला चढविला, तर त्याला चीन नाही, अमेरिकेची धोरणे जबाबदार असतील, असे चीनचे उपरराष्ट्रमंत्री सुचवित आहेत.
शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली होती. या चर्चेत अमेरिकेने युक्रेनमधील युद्धात चीनने रशियाला सहाय्य केले, तर त्याचे भयंकर परिणाम चीनला भोगावे लागतील, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनला बजावले होते. याला अमेरिकी माध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली. पण याच बैठकीत चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी तैवानवरून अमेरिकेला दिलेल्या इशार्याकडे बर्याचजणांचे दुर्लक्ष झाले. अमेरिकेतील काहीजण तैवानच्या मुद्यावर चीनला चिथावणी देत आहेत आणि ते खपवून घेणार नाही, असे चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते.
त्याच्याही आधी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्या क्वाड संघटनेवर टीका केली होती. हे संघटन चीनला रोखण्यासाठीच स्थापन झाल्याचा ठपका परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी ठेवला होता. इतकेच नाही तर क्वाड म्हणजे ‘एशिया-पॅसिफिक’ क्षेत्रातील नाटोच असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. यानंतर चीनचे उपपरराष्ट्रमंत्री ली युचेंग देखील त्याच भाषेत अमेरिकेला इशारे देत आहेत. युक्रेनवर रशियाने चढविलेल्या हल्ल्याला नाटोची विस्तारवादी धोरणे जबाबदार आहेत.
संपूर्ण सुरक्षा संपादन करण्याच्या नादात नाटोने युरोपात विस्तारवादी धोरणे स्वीकारली होती. मात्र याचे विपरित परिणाम समोर आले असून संपूर्ण सुरक्षेच्या ऐवजी अधिकच असुरक्षितता समोर आलेली आहे, अशी टीका युचेंग यांनी केली. अमेरिका नाटोच्याच धर्तीवर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात गट-तट उभे करून या क्षेत्रात दुही माजविणारे धोरणे आखत असल्याचा दावा युचेंग यांनी एका अभ्यासगटासमोर दिलेल्या व्याख्यानात केला.
अमेरिकेच्या या धोरणाचे भयंकर परिणाम समोर येतील, असे सांगून युचेंग यांनी चीनचे इरादे स्पष्ट केले आहेत. अमेरिका-नाटोचे सारे लक्ष युक्रेनमधील युद्धाकडे लागलेले असताना, चीन तैवानवर हल्ला चढवील, असे इशारे जगभरातील विश्लेषक देत आहेत. या पार्श्वभूमीवर युचेंग यांनी चीनने तैवानवर हल्ला चढविल्यास, त्याला अमेरिकेची धोरणे जबाबदार असतील, असे सुचविले आहे. अमेरिका व चीनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेल्या चर्चेनंतर, चीनकडून असे इशारे येत आहेत, ही लक्ष वेधून घेणारी बाब ठरते. चीन तैवानवरील हल्ल्याची पूर्वतयारी करीत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.
युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यानंतर, चीन तैवानवर आक्रमण करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. पण चीन म्हणजे रशिया नाही आणि तैवान म्हणजे युक्रेन नाही, अशा स्पष्ट शब्दात तैवानने चीनला समज दिली होती. जपान देखील चीनच्या हालचालींवर आपली करडी नजर रोखलेली असल्याचे सातत्याने बजावत आहे. त्याचवेळी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी तैवानबाबतचे अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाचे धोरण धरसोडीचे असल्याचा ठपका ठेवला होता. चीन याचा लाभ घेईल, अशी चिंता ऍबे यांनी व्यक्त केली होती.