वॉशिंग्टन – रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याला विरोध करताना भारत कचरत असल्याचा ठपका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ठेवला आहे. याद्वारे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला लक्ष्य केल्याचे दिसते. रशियाकडून भारत सुमारे ३० लाख बॅरल्स इतके इंधन खरेदी करीत असून यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. पण भारताच्या कितीतरी अधिक पटीने अमेरिकेचे युरोपातील सहकारी देश रशियाकडून अजूनही इंधनाची खरेदी करीत आहेत, ही बाब भारताने लक्षात आणून दिली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पुन्हा एकदा भारतावर शेरेबाजी केल्याचे दिसत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत तसेच आमसभेत देखील युक्रेनवर हल्ला चढविणार्या रशियाच्या विरोधात भारताने मतदान करण्याचे टाळले होते. यासंदर्भात भारताने तटस्थ भूमिका स्वीकारली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा प्रभाव दिसू लागला होता. युएई, बांगलादेश तसेच पाकिस्तानने देखील या प्रश्नावर तटस्थ भूमिका स्वीकारली होती. यामुळे बायडेन प्रशासन अस्वस्थ झाले होते. यासंदर्भात अमेरिका भारताशी चर्चा करीत असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. पण प्रत्यक्षात ही चर्चा म्हणजे भारतावर दडपण वाढविण्याचे निरनिराळे प्रयोग होेते. मात्र भारताने त्याला दाद दिली नाही.
इतकेच नाही तर रशियाने दिलेला सवलतीच्या दरातील इंधनाचा प्रस्ताव भारताने स्वीकारला आहे. यावर अमेरिकेची प्रतिक्रिया उमटणे ही अगदी स्वाभाविक बाब ठरते. सुरूवातीला या व्यवहारावर नाराजी व्यक्त करणार्या अमेरिकेने भारताच्या या निर्णयाची इतिहास नोंद घेईल, असा इशारा दिला होता. यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया नुलँड भारताच्या भेटीवर दाखल झाल्या असून त्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा केली. याच दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताबाबत केलेली विधाने लक्ष वेधून घेणारी ठरतात.
अमेरिकेतील उद्योजकांच्या बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना पुरते ओळखून असल्याचा दावा केला. त्याचवेळी युक्रेनवर हल्ला चढविणार्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना या मुद्यावर नाटोत फूट पडेल, असे वाटत होते, असे बायडेन म्हणाले. मात्र नाटोने त्यांचे अंदाज चुकविले असून नाटो या मुद्यावर पुतिन यांच्या विरोधात ठामपणे उभी असल्याचे बायडेन म्हणाले. त्याचवेळी क्वाडमधील भारताचा अपवाद वगळता, जपान व ऑस्ट्रेलिया देखील रशियाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत, असे सांगून बायडेन यांनी भारताला लक्ष्य केले.
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाविरोधात भूमिका घेताना भारत कचरत असल्याचा ठपक ठेवून भारताचे तटस्थ धोरण कमकुवतपणाचा भाग असल्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन देत आहेत. त्याचवेळी भारताच्या क्वाडबरोबरील तसेच अमेरिकेबरोबरी मैत्रीवरही बायडेन या टीकेद्वारे शंका उपस्थित करीत आहेत. याआधीही बायडेन प्रशासनाने भारताबाबत अशाच स्वरुपाची भूमिका स्वीकारली होती. मात्र युक्रेनच्या मुद्यावरील तटस्थ भूमिका हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा भाग असल्याचे भारत ठासून सांगत आहे.
त्याचवेळी युक्रेनच्या मुद्यावर नाटोचे सारे सदस्यदेश रशियाविरोधात एकवटलेले आहेत, हा बायडेन यांचा दावा विश्वसनीय नाही. कारण नाटोचे सदस्य असलेल्या काही युरोपिय देशांनी युक्रेन युद्धासंदर्भात अमेरिका व नाटोची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे उघडपणे सांगितले होते. तर क्वाडचे सदस्य असलेले जपान व ऑस्ट्रेलिया हे देश संरक्षणासाठी पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून आहे. यामुळे त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे स्वातंत्र्य हा अमेरिकेच्या मर्जीचा भाग ठरतो. मात्र भारतावर असे बंधन नसून भारताचे परराष्ट्र धोरण सार्वभौम आहे व भारत वेळोवेळी अमेरिकेला याची जाणीव करून देत आहे.