वॉशिंग्टन/लंडन – ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’चा संसर्ग तीव्र होत असतानाच, हा हिवाळा म्हणजे लस न घेतलेल्यांसाठी ‘विंटर ऑफ डेथ’ ठरेल, असा गंभीर इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. बायडेन यांच्या या इशार्याला युरोपिय देशांमधील तज्ज्ञही दुजोरा देत असून ब्रिटनमधील कोरोना बळींची संख्या प्रतिदिन पाच हजारांपर्यंत जाऊ शकते, असे बजावण्यात आले आहे. जर्मनीने ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’चा फैलाव ही जर्मनीतील पाचवी मोठी लाट ठरु शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी ब्रिटीश संशोधकांचा नवा अहवाल समोर आला असून त्यात ओमिक्रॉन हा ‘डेल्टा व्हेरिअंट’पेक्षा सौम्य नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेल्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’ची व्याप्ती वेगाने वाढत आहे. अमेरिका व युरोपमध्ये रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढण्यास सुरुवात झाली असून नवी लाट आल्याचे संकेत देण्यात येत आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या तीन दिवसात तब्बल अडीच लाखांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. येत्या दोन दिवसात प्रतिदिन आढळणार्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोरोनामुळे दगावणार्यांची आकडेवारीही १००च्या वर गेली आहे. ब्रिटनमधील एकूण रुग्णसंख्या एक कोटी १२ लाखांवर जाऊन पोहोचली असून सुमारे दीड लाख जणांचा बळी गेला आहे.
अमेरिकेतही दर दिवशी आढळणार्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेले पाच दिवस अमेरिकेत सातत्याने एक लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून शुक्रवारी १ लाख, ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहे. कोरोनामुळे २४ तासांमध्ये दगावणार्यांची संख्याही दोन हजारांवर गेली असून आतापर्यंत आठ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे यात पुन्हा भयावह वाढ होण्याचे संकेत मिळत असून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा इशारा त्याचीच जाणीव करून देणारा ठरला आहे.
ओमिक्रॉनचे संकट टाळण्यासाठी बूस्टर डोसची शिफारस करण्यात आली आहे. मात्र अमेरिकेत अद्यापही कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्यांचे प्रमाणही मोठे आहे. यावर नाराजी व्यक्त करताना, ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांच्यासाठी हा हिवाळा मृत्यू व आजारपण देणारा असेल, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बजावले. जगातील इतर देशांमधील तज्ज्ञांनीही बायडेन यांच्या इशार्याला दुजोरा देणारी वक्तव्ये केली आहेत.
ब्रिटनमधील आघाडीचे तज्ज्ञ नील फर्ग्युसन यांनी, कडक लॉकडाऊनची शिफारस केली आहे. तसे नाही झाले तर ब्रिटनमध्ये ‘ओमिक्रॉन’मुळे दिवसाला पाच हजार जणांचा बळी जाण्याची भीती असल्याचा इशारा फर्ग्युसन यांनी दिला. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिअंटचे सुमारे १५ हजार रुग्ण आढळले आहेत. दरम्यान ओमिक्रॉन हा यापूर्वी हाहाकार उडविणार्या ‘डेल्टा व्हेरिअंट’पेक्षा सौम्य असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असा अहवाल ब्रिटनच्या ‘इंपिरियल कॉलेज ऑफ लंडन’ने दिला. जर्मनीचे आरोग्यमंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी, ओमिक्रॉनमुळे येणारी लाट प्रचंड मोठी असू शकते अशी चिंता व्यक्त केली आहे. तर ‘फायझर’ या आघाडीच्या लसनिर्मिती कंपनीने कोरोना साथीचा प्रभाव २०२४ सालापर्यंत असेल, अशी शक्यता वर्तविली आहे.