वॉशिंग्टन/किव्ह – रशियन अणुहल्ल्यांचा वाढता धोका लक्षात घेऊन युक्रेनने युद्ध थांबविण्यासाठी रशियाबरोबर चर्चा करावी, यासाठी अमेरिका युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवर दडपण आणत असल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने यासंदर्भात दावा केला. गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकी दैनिकाचा दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ रशिया-युक्रेन युद्ध सुरू असून दोन्ही बाजूंकडून संघर्ष थांबविण्याचे कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. उलट पूर्व तसेच दक्षिण युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियानेही गेल्या काही आठवड्यांमध्ये युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रे व ड्रोन्सच्या सहाय्याने जबर हल्ले करून युक्रेनी लष्कराला जेरीस आणले आहे. त्याचवेळी रशियन अणुहल्ल्याच्या मुद्दाही ऐरणीवर आला असून रशियाची वक्तव्ये व हालचाली पाश्चिमात्य देशांसह आंतरराष्ट्रीय समुदायाला अस्वस्थ करणाऱ्या ठरल्या आहेत.
युरोप, लॅटिन अमेरिका तसेच आफ्रिकी देशांमध्येही रशिया-युक्रेन युद्ध लांबत चालल्याने नाराजी वाढत चालल्याचा दावा अमेरिकी दैनिकाने केला. अणुयुद्धाचा वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी रशियन राष्ट्राध्यक्षांनी चर्चा करण्यात येणार नाही, असा ठराव युक्रेनमध्ये मंजूर करून घेतला होता. यावर अमेरिकेने आक्षेप घेतला असून ही बंदी बाजूला सारून झेलेन्स्की यांनी रशियाबरोबरील चर्चेचे मार्ग खुले करावेत, अशी आग्रही भूमिका अमेरिकी अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
अमेरिका युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभी असली तरी अनेक सहकारी देश लांबणाऱ्या युक्रेन युद्धाला कंटाळले आहेत. अनेक वर्षे हे युद्ध चालू ठेवता येणार नाही, असा सूर युरोपिय देशांमधून उमटण्यास सुरुवात झाली आहे. आठ महिने सुरू असलेल्या संघर्षानंतर अनेक युरोपिय देशांमध्ये अर्थव्यवस्था संकटात आली असून जनतेतील नाराजीही वाढत चालली आहे. त्याचवेळी युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रपुरवठ्यामुळे युरोपिय संरक्षणदलांवरही ताण येत असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. हे सर्व घटक लक्षात घेऊन अमेरिकेने युक्रेनवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने म्हटले आहे.
दरम्यान, शांतीचर्चेसाठी दबाव टाकण्यात येत असतानाच अमेरिकेने युक्रेनला 40 कोटी डॉलर्सच्या नव्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे.