नवी दिल्ली/वॉशिंग्टन – २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार तहव्वूर हुसेन राणाला भारताच्या हवाली करण्याची विनंती भारतीय यंत्रणांनी केली होती. यापार्श्वभूमीवर अमेरिका राणाच्या प्रत्यार्पणासाठी तयार असल्याचे स्पष्ट होत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच अमेरिकी यंत्रणांनी तहव्वूर राणाला पुन्हा अटक केली. त्याच्या जामिनाच्या अर्जाला विरोध करताना फेडरल कोर्टात अमेरिकी अटॉर्नीने राणाला भारताच्या हवाली केले जाऊ शकते, असे न्यायालयात सांगितले. मात्र त्याचवेळी मुंबई हल्ल्याचा आणखी एक गुन्हेगार डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिका भारताच्या ताब्यात देणार नाही, असेही अमेरिकेच्या अटॉर्नीने न्यायालयात स्पष्ट केले आहे.
तहव्वूर राणा आणि हेडली उर्फ दाऊद गिलानी हे दोघे मुंबई हल्ल्यातील कटात सहभागी होते. २००६ पासून यासाठी कट आखला जात होता. हेडलीने यासाठी मुंबईत येऊन रेकी केली होती आणि संवेदनशील माहिती आणि फोटोग्राफ पाकिस्तानच्या ‘लश्कर-ए-तोयबा’पर्यंत पोहोचवले होते. मात्र या कामासाठी हेडलीला तहव्वूर राणाने तयार केले होते आणि त्याचा खर्चतही राणाने उचलल्याचे हेडलीने मुंबई न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविलेल्या जबानीत सांगितले होते.
तहव्वूर राणा हा पाकिस्तानी लष्करातील निवृत्त अधिकारी असून त्याचा ताबा मिळविण्यासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. राणा आणि हेडलीचा ताबा मिळविण्याचे प्रयत्न याआधीही भारतीय यंत्रणांनी केले होते. मात्र आता हेडलीला नाही, पण राणाला भारताच्या हवाली करण्यास अमेरिका तयार झाला आहे. अमेरिकेच्या अटॉर्नीने तेथील फेडरल कोर्टात दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
राणाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला अमेरिकेच्या कारागृहातून सोडण्यात आले होते. मात्र मात्र १० जून रोजी भारताच्या विनंतीनंतर अमेरिकी यंत्रणांनी त्याला पुन्हा अटक केली होती. त्यानंतर अमेरिका राणाला भारताच्या हवाली करणार असल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने आल्या होत्या. अमेरिकेच्या अटॉर्नीने न्यायालयात दिलेल्या माहितीवरून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हेडलीला अमेरिकी न्यायालयाने ३५ वर्षांची आणि राणाला १४ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.