नवी दिल्ली – अमेरिका भारताला अतिशय महत्त्वाचे संरक्षणविषयक तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यास तयार झाला आहे. मात्र याबाबत आताच माहिती उघड करता येणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. भारत संरक्षणक्षेत्रातही आत्मनिर्भरतेवर भर देत आहे. दुसऱ्या देशांवर विसंबून नसलेल्या नव्या स्वावलंबी भारताचे ध्येय घेऊन आम्ही पुढे जात असून अनेक देशांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकींची तयारी दर्शविली आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
स्तब्ध राहून पाहत राहणारा आजचा भारत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही धाडसी निर्णय घेत आहोत. कोणावरही विसंबून न राहणाऱ्या आत्मनिर्भर अशा नव्या भारताच्या स्वप्नाची पायाभरणी केली जात आहे. याच अंतर्गत संरक्षण मंत्रालयाने ३१० हून अधिक संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर बंदी टाकली आहे आणि खाजगी क्षेत्राला देशातच या संरक्षण साहित्याचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. यामुळे देशांतर्गत संरक्षण साहित्य व शस्त्र विकसित होतील. भारतातील स्थानिक उद्योगाकडे जमीन, जल, आकाश आणि अवकाश या क्षेत्रातील संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता आहे. येत्या काही वर्षात भारतात विविध प्रकारच्या संरक्षण साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू होईल. सरकार या क्षेत्राला आवश्यक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिका भारताला अतिशय महत्त्वाचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यास तयार झाल्याचे घोषित केले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वीच आपली चर्चा झाली. यावेळी ऑस्टिन यांनी अमेरिका भारताला हे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. तसेच भारताला त्याचे उत्पादन घ्यायचे असेल, तर ते भारतातच घेता येईल, असे ऑस्टिन यांनी म्हटल्याचे राजनाथ सिंग म्हणाले. मात्र आताच याबद्दलची माहिती उघड करता येणार नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले. भारत २०२५ सालापर्यंत भारतात १.७५ लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन घेण्याचे ठेवण्यात आलेले लक्ष्य नक्की गाठू, असा विश्वासही संरक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.