वॉशिंग्टन – जगातील सर्वात प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या अमेरिकन सुरक्षा यंत्रणेत मोठ्या उणीवा असल्याचे नव्याने उघड झाले आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे बुधवारी अमेरिकन काँग्रेसची इमारत घाईघाईने रिकामी करणे भाग पडले. यावर प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी सडकून टीका केली. ही चूक अपमानजनक आणि अक्षम्य असल्याचे ताशेरे नॅन्सी पेलोसी यांनी ओढले आहेत.
11 सप्टेंबर रोजी 2001 साली अल कायदाच्या दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर्स तसेच संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनवर प्रवासी विमाने धडकवली होती. दोन दशकांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात शेकडो जणांचा बळी गेला होता. बुधवारी संध्याकाळी युएस कॅपिटल अर्थात अमेरिकन काँग्रेसच्या हवाईहद्दीतून लष्करी विमानाने प्रवास केल्यानंतर 9/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या त्या आठवणी ताज्या झाल्या. अनोळखी विमानापासून धोका असल्याचे सांगून काँग्रेसच्या सुरक्षेसाठी तैनात अमेरिकन पोलिसांनी या इमारतीतील सर्वांना बाहेर काढले.
पण पुढच्या काही तासातच सदर विमान अमेरिकन लष्कराचेच असल्याचे उघड झाले. अमेरिकन काँग्रेसच्या इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या ‘नॅशनल्स स्टेडियम`मध्ये बेसबॉलचा सामना सुरू होणार होता. त्यासाठी अमेरिकन लष्कराच्या ‘गोल्डन नाईट स्कायडायव्हर्स`ना आमंत्रित करण्यात आले होते. याची पूर्वसुचना एफएएला देण्यात आली होती. पण यानंतरही एफएएने अमेरिकन पोलिसांना ही माहिती कळविली नाही.
ही अव्यवस्था आणि समन्वयातील अभाव यामुळे काही काळ अमेरिकन काँग्रेसच्या इमारतीत खळबळ उडाली होती. अमेरिकन काँग्रेस सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. पण पुढच्या काही तासातच, चुकीच्या माहितीमुळे ही पळापळ झाल्याचे समोर आले आहे. नॅशनल स्टेडियमवर लष्कराच्या पॅराट्रूपर्सच्या कवायतींची माहिती ‘एफएए`ने वॉशिंग्टनमधील पोलिसांना कळविली नव्हती. त्यामुळे हा सारा प्रकार घडल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले.
अमेरिकन काँग्रेसच्या सभापती नॅन्सी पेलोसी या प्रकरणी एफएएवर डाफरल्या आहेत. एफएएची चूक माफ करता येण्याजोगी नसल्याचे पेलोसी यांनी म्हटले आहे. यामुळे काँग्रेस सदस्यांच्या जीवावर बेतले असते, असा इशारा देऊन पेलोसी यांनी गेल्या वर्षी अमेरिकन काँग्रेसवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून दिली. गेल्या वर्षी 6 जानेवारी रोजी काही माथेफिरूंनी अमेरिकन काँग्रेसचा ताबा घेतला होता. या घटनेवर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच अमेरिकन सुरक्षा यंत्रणेच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. बुधवारच्या घटनेनंतरही सोशल मीडियामध्ये हाच प्रश्न विचारला जात आहे.