अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या केंद्रांवर हल्ले चढवावे

- अमेरिकन विश्‍लेषक मायकल रुबीन यांची मागणी

वॉशिंग्टन – अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या सैन्यमाघारीचा अमेरिकेच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही, असे आश्‍वासन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकन जनतेला दिले होते. पण प्रत्यक्षात उलटेच होत असून अफगाणिस्तानच्या प्रत्येक शहरामध्ये ‘आयएस-खोरासान’चा विस्तार होत आहे, याची परखड जाणीव अमेरिकेचे विश्‍लेषक मायकल रुबीन यांनी करून दिली. अफगाणिस्तानातील दहशतवादाच्या समस्येचे मूळ या देशातील काबुल व कंदहार नसून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद व लष्करी मुख्यालय रावळपिंडीमध्येच दहशतवाद्यांचे केंद्रे आहेत. त्यावर अमेरिकेने हल्ले चढवावे, अशी जोरदार मागणी रुबीन यांनी केली आहे.

अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या केंद्रांवर हल्ले चढवावे - अमेरिकन विश्‍लेषक मायकल रुबीन यांची मागणी‘अमेरिकन इंटरप्राईझ इन्स्टीट्युट-एईआय’चे विश्‍लेषक आणि पेंटॅगॉनचे अधिकारी म्हणून काम केलेल्या मायकल रुबीन यांना आखाती क्षेत्राबाबतचे विशेषज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांनी अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतरच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले असून आत्ताची परिस्थिती अमेरिकेच्या सुरक्षेला आव्हान देणारी असल्याचा दावा केला. अमेरिकन साप्ताहिकासाठी लिहिलेल्या लेखात रुबीन यांनी अमेरिकेला परखड वास्तवाची जाणीव करून दिली. आत्ताच्या काळात अफगाणिस्तानच्या प्रत्येक प्रांतात ‘आयएस-खोरासान’ या खतरनाक दहशतवादी संघटनेचा विस्तार झालेला आहे. अशा परिस्थितीत दहशतवादाच्या मूळावर प्रहार करणे अमेरिकेसाठी अनिवार्य बनलेले आहे, असे रुबीन यांनी या लेखात बजावले.

अफगाणिस्तानचे काबुल व कंदहार हे प्रांत म्हणजे दहशतवाद्यांची केंद्रे नाहीत. तर दहशतवाद्यांची केंद्रे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद व पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीत आहेत, असे सांगून पाकिस्तानने आजवर अमेरिकेबरोबर केलेल्या ‘डबल गेम’चा रुबीन यांनी पर्दाफाश केला. अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढविल्यानंतरच्या काळात, गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तान असा डबल गेम करून अमेरिकेचा विश्‍वासघात करीत आला आहे, असे रुबीन यांनी या लेखात म्हटले आहे. अमेरिकेकडून दहशतवादविरोधी युद्धातील सहाय्यासाठी मिळणारा निधी पाकिस्तानने तालिबानलाच पुरविला, वर अल कायदाप्रमुख ओसामा बिन लादेनला आश्रय दिला, याची आठवण मायकल रुबीन यांनी करून दिली.

अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या मानहानीकारक माघारीने दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असलेले पाकिस्तानी अधिकारी खूश झाले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचे राजनैतिक अधिकारी आपला देश दहशतवाद्यांच्या विरोधात असल्याचे दावे करीत असले तरी प्रत्यक्षात ते दहशतवाद्यांच्या बाजूने उभे असल्याचे त्यांच्या कारवाया दाखवून देत आहेत. १३ वर्षांपूर्वी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘लश्कर-ए-तोयबा’ने मुंबईवर दहशतवादी हल्ला चढवून १६० हून अधिकजणांचा बळी घेतला व यात १३ वर्षांच्या मुलीसह सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. यानंतरही पाकिस्तानने या दहशतवादी संघटनेवर कारवाई करण्याचे सोडून त्यांना प्रोत्साहन दिले होते, याकडे रुबीन यांनी लक्ष वेधले.

इतकेच नाही तर मुंबई, कराची व काबुलमध्ये अमेरिकन नागरिकांचा बळी घेणार्‍या दहशतवाद्यांना पाकिस्तान पाठिशी घालत आला आहे. या सार्‍याची दखल घेऊन अमेरिकेचे व्हाईट हाऊस, परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मायकल रुबीन यांनी केली. याच्या परिणामांची जाणीव पाकिस्तानला करून देणे व अमेरिकेचा निर्धार प्रदर्शित करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. आपण पाकिस्तानात सुरक्षित आहोत, हा दहशतवाद्यांचा समज अमेरिकेने मोडीत काढायलाच हवा, त्यासाठी अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी तयार केलेल्या ‘ओव्हर द हॉरिझॉन’ धोरणाचा वापर करावा, असे आवाहन मायकल रुबीन यांनी केले आहे.

leave a reply