वॉशिंग्टन – गलवान खोर्यातील संघर्षात जखमी झालेल्या आपल्या लष्करी अधिकार्याला चीनने विंटर ऑलिपिंकमध्ये विशेष सन्मान दिला होता. चीनच्या या चिथावणीखोर कारवाईविरोधात अमेरिका भारतासोबत आहे, असा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केला. तसेच युक्रेनच्या प्रश्नावर भारताने रशियाच्या विरोधात जाण्याचे नाकारले, तरी त्याचा अमेरिकेच्या भारताबरोबरील संबंधांवर परिणाम होणार नाही, असेही प्राईस यांनी स्पष्ट केले.
२०२० सालच्या जून महिन्यात लडाखच्या एलएसीवरील गलवान खोर्यात भारत व चीनच्या लष्कराचा संघर्ष झाला होता. यात भारतीय सैन्याचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले होते. या संघर्षात चीनच्या लष्कराने भारतापेक्षा अधिक जवान गमावले होते. पण चीनने याची माहिती दडपून टाकली. मात्र या संघर्षात जखमी झालेल्या आपल्या अधिकार्याकडे बीजिंग विंटर ऑलिंपिकची मशाल सोपवून चीनने त्याचा बहुमान केला होता. चीनच्या या चिथावणीवर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनची ही कारवाई दुर्दैवी असल्याचे सांगून त्याचा निषेध नोंदविला. चीनमधील विंटर ऑलिंपिकच्या उद्घाटन व समारोप सोहळ्याला अनुपस्थित राहून भारत आपला निषेध नोंदविणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी जाहीर केले होेते.
भारताच्या या निर्णयाच पडसाद उमटले आहेत. अमेरिकेने या प्रकरणी आपण भारतासोबत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी चीनच्या सदर कारवाईवर टीका केली. भारत व चीनच्या सीमेवरील तणावावर अमेरिकेने याआधी चिंता व्यक्त केली होती. या प्रश्नावर अमेरिका आपला भागीदार देश भारताच्या बाजूने ठामपणे उभी आहे, असे प्राईस म्हणाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्राची समृद्धी, स्थैर्य यासंदर्भात अमेरिका व भारतची धोरणे एकसमान आहेत, असे प्राईस पुढे म्हणाले.
याआधीही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या सीमेवर तसेच इतर शेजारी देशांविरोधातील चीनच्या कुरापतखोर कारवायांवर चिंता व्यक्त केली होती. पण भारत व चीन सामोपचाराने एलएसीचा वाद सोडवतील, त्यात अमेरिकेने नाक खुपसू नये, असे चीनने बजावले होते. मात्र विंटर ऑलिंपिकदरम्यान भारताला चिथावणी देऊन चीनने सीमावाद सामोपचाराने सोडविण्यासाठी लागणारा प्रमाणिकपणा व प्रगल्भता आपल्याकडे नसल्याचे दाखवून दिले आहे.
दरम्यान, युक्रेनच्या प्रश्नावर अमेरिकेने रशियाच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारलेली आहे. याला भारतानेही साथ द्यावी आणि रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारावी, यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत या मुद्यावर भारताने तटस्थपणा दाखवून अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी रशियाने भारताचे आभार मानले होते. मात्र भारताने रशियाच्या विरोधात जाण्यास नकार दिला, तरी याचा अमेरिका आणि भारताच्या संबंधांवर परिणाम होणार नाही, असे प्राईस यांनी स्पष्ट केले. भारत व अमेरिकेचे संबंध स्वतंत्र असून त्यावर भारताच्या रशियाबाबतच्या भूमिकेचा परिणाम होणार नाही, असे प्राईस म्हणाले.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय असे दावे करीत असले तरी मानवाधिकार तसेच व्यापारी मतभेदांच्या मुद्याला अवास्तव महत्त्व देऊन बायडेन प्रशासन भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. मात्र भारताच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकरली तर त्याचे पडसाद उमटतील, याची जाणीव असलेल्या बायडेन प्रशासनाकडून यासंदर्भात अधिक सावधगिरी दाखविली जात असल्याचे दिसत आहे.