वॉशिंग्टन – आपल्या अण्वस्त्रांवर नियंत्रण नसलेला पाकिस्तान हा जगातील सर्वात घातक देश असल्याचे जाहीर करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी खळबळ माजविली होती. मात्र याला काही दिवस उलटत नाही तोच, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचा निर्वाळा दिला. त्याचवेळी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या विधानांना दुजोरा देऊन याबाबत नवे असे काही सांगण्यासारखे नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेल्या विधानांचा अमेरिकेच्या धोरणावर काहीही प्रभाव पडलेला नसल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.
युक्रेनचे युद्ध, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या व अण्वस्त्र चाचण्याची धमकी, तैवानविरोधातील चीनच्या कुरापतखोर कारवायांचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानातील अण्वस्त्रांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. अण्वस्त्रांवर नियंत्रण नसलेला पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक घातक देशांपैकी एक असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. तसेच पाकिस्तानची अण्वस्त्रे चुकीच्या हातात पडू शकतात, यावर बायडेन यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव केरिन जीन-पेरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बायडेन यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला दुजोरा दिला. राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या विधानांपेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, त्यात भर घालण्यासारखे नवे असे काहीच नसल्याचा दावा जीन-पेरी यांनी पत्रकार परिषदेत केला.
अमेरिकेने याआधीही देखील पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत चिंता व्यक्त केली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यापेक्षा वेगळे काहीही बोलले नाहीत, असे संकेत देण्याचा प्रयत्न जीन-पेरी यांनी केल्याचे बोलले जाते. मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत वेगळीच भूमिका घेतली आहे. पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालायाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले. तसेच पाकिस्तानकडे आपल्या अण्वस्त्रांची सुरक्षा करण्याची क्षमता असल्याचा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला. याबरोबरच अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी पाकिस्तान हा अत्यंत महत्त्वाचा देश असून पाकिस्तानबरोबरील सहकार्याला अमेरिका महत्त्व देत राहिल, असे सांगून पटेल यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेल्या विधानांच्या अगदी विरूद्ध टोकाची भूमिका मांडली.
राष्ट्राध्यक्ष बायडेन आपल्या भाषणांमधून करीत असलेली विधाने आणि त्यांच्या प्रशासनाच्या हालचाली यामध्ये सुसंगती नाही, अशी टीका सातत्याने होत आहे. पाकिस्तानबाबतचे राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांच्या प्रशासनाचे धोरण या टीकेला दुजोरा देणारी बाब ठरते. एकीकडे पाकिस्तानला सर्वाधिक घातक देश ठरविणाऱ्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या हवाई दलातील एफ-16 लढाऊ विमानांसाठी 45 कोटी डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. हे सहाय्य दहशतवादविरोधी कारवायांसाठी असल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला होता. असे हास्यस्पद खुलासे करून अमेरिका भारताला मूर्ख बनवू शकणार नाही, अशा खरमरीत शब्दात भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केले होते.
त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानविरोधात विधाने करून भारताला आश्वस्त केल्याची दाट शक्यता समोर येत आहे. मात्र बायडेन प्रशासनावर आपला तितकासा विश्वास राहिलेला नसल्याचे स्पष्ट संकेत भारताने दिले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात पोकळ विधाने करून भारताचे समाधान होणार नाही, याची जाणीव एव्हाना बायडेन प्रशासनाला झालेली असावी. याचे प्रतिबिंब अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिक्रियेमध्ये उमटल्याचे दिसत आहे.