ब्रुसेल्स – ‘झिंजिआंग प्रांतात मोठे कारखाने उभारून त्यात उघुरवंशियांना गुलाम कामगारांसारखे वापरणारा चीन, कामगारांच्या हक्कांचा आदर करील, असे म्हणून काहीजण स्वतःचा बालिशपणा लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनच्या राजवटीकडून होणार्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाची कल्पना असतानाही युरोपिय महासंघ त्यांच्याशी भागीदारी करण्यासाठी धडपडत आहे. ही बाब युरोपचा मुखवटा फाडणारी ठरते’, असा घणाघाती टोला अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार मॅथ्यू पॉटिंगर यांनी लगावला आहे. तैवानच्या उपराष्ट्राध्यक्षांनीही या करारावर नाराजी व्यक्त करताना, युरोपिय देश काय गमावित आहेत याची त्यांना अजूनही कल्पना आलेली नाही, असे बजावले आहे.
युरोपिय महासंघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डर लेयेन यांनी बुधवारी ‘ईयू-चायना कॉम्प्रेहेन्सिव्ह अॅग्रीमेंट ऑन इन्व्हेस्टमेंट’वर प्राथमिक पातळीवर एकमत झाल्याची माहिती दिली. युरोपिय महासंघाचे प्रमुख चार्ल्स मिशेल, जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे एकमत झाल्याचे लेयेन यांनी सांगितले. परस्परांशी समान व्यवहार, स्पर्धेसाठी योग्य वातावरण व मूल्यांचा आदर या आधारावर युरोप चीनबरोबर भागीदारीसाठी तयार आहे, असे महासंघाने यावेळी स्पष्ट केले. चीनने युरोपबरोबर झालेल्या कराराचे स्वागत केले असून पुढील काळात अमेरिकेबरोबरील संबंध पूर्ववत होण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मात्र अमेरिकेत या करारावरून नाराजीचे सूर उमटले आहेत. सदर करार अमेरिका व युरोपमधील व्यापारी संबंधांना धक्का देणारा ठरु शकतो, असा दावा अमेरिकेतील विश्लेषकांनी केला आहे. यापुढे अमेरिकेबरोबर व्यापार व गुंतवणूक क्षेत्रात व्यवहार करताना, युरोपला चीनकडून कराराचे पालन होत असल्याचे पटवून द्यावे लागेल, असा दावाही विश्लेषकांनी केला. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारांनी युरोपचा मुखवटा फाटल्याचे टीकास्त्र सोडतानाच, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युरोपकडून घेण्यात येणारे आक्षेप चुकीचे ठरल्याचाही दावा केला.
‘अमेरिकेबरोबरील संबंध सुधारण्याच्या मार्गात ट्रम्प प्रशासन मोठा अडथळा असल्याचे युरोपिय महासंघाकडून सतत सांगण्यात येत होते. मात्र ट्रम्प हा मुद्दा नसून खरे कारण युरोपियन नेतृत्त्व व त्यांची भूमिका हेच होते, हे चीनबरोबरील करार दाखवून देतो’, असा आरोपही राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार मॅथ्यू पॉटिंगर यांनी केला. अमेरिकेपाठोपाठ तैवाननेही युरोप-चीन करारावरून युरोपला फटकारले आहे. करार झाला असला तरी गुलाम कामगारांचा वापर, बाजापेठेची उपलब्धता, शाश्वत विकास, बुद्धिसंपदा हक्क यासारख्या मुद्यांवर काय निर्णय होतात याकडे लक्ष द्यावे लागेल, असे तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले.
‘चीनबरोबरील करारातून काय मिळते हे फक्त दिसते, पण काय गमावले हे कळत नाही’, अशा शब्दात तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष लाय चिंग-ते यांनी युरोपला सावधगिरीचा इशारा दिला. हा करार युरोपसारख्या लोकशाहीवादी व्यवस्थेसाठी खूप मोठे संकेत आहेत, असे सूचक वक्तव्यही तैवानी उपराष्ट्राध्यक्षांनी केले.