वॉशिंग्टन – चीनच्या आक्रमक कारवाया लक्षात घेऊन अमेरिका लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये सहा बी-52 बॉम्बर्स रवाना करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील डार्विन तळावर या विमानांची तैनाती केली जाईल, असा दावा ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीने केला. महिन्याभरापूर्वी ऑस्ट्रेलियाने अमेरिकेकडून बी-21 स्टेल्थ बॉम्बर्सच्या खरेदीसाठी विचारणा केली होती.
डार्विन येथील टिंडाल हवाईतळावर ‘स्क्वाड्रन ऑपरेशन्स फॅसिलिटी’ उभारण्यासाठी अमेरिकेने हालचाली तीव्र केल्याचे ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीने आपल्या विशेष कार्यक्रमात म्हटले आहे. या तळावर सहा बी-52 बॉम्बर्सच्या तैनातीसाठी पुरेशी जागा करणे आणि त्यांच्या देखभालीसाठी नवे सेंटर उभारण्यावर अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन विचार करीत आहे. यासाठी किमान 10 कोटी डॉलर्सचा खर्च अपेक्षित असल्याचा दावा केला जातो.
गेल्या वर्षी अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या भेटीत यावर चर्चा पार पडली होती. अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली बॉम्बर्सची ही तैनाती चीनसाठी इशारा असल्याचा दावा ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीने केला.