वॉशिंग्टन – जर्मनीने चीनकडे १६५ अब्ज डॉलर्सच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मात्र अमेरिका चीनकडून याहून अधिक नुकसानभरपाईची वसूली करील. ही नुकसानभरपाई जबर असेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तसेच कोरोनाव्हायरसच्या उगमस्थानाबाबत कसून चौकशी सुरू असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या इशाऱ्यामुळे बिथरलेल्या चीनने राजकीय डाव खेळू नका, अशी अमेरिकेवर टीका केली आहे.
कोरोनाव्हायरसची निर्मिती चीनच्या वुहान प्रांतातील प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप जगभरातून तीव्र होऊ लागला आहे. अमेरिकेबरोबर, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, तैवान या देशांसह फ्रान्स, जर्मनी, रशियातील संशोधक, विश्लेषक व पत्रकार कोरोनाव्हायरससाठी चीनला धारेवर धरू लागले आहेत. गेल्या आठवड्यात जर्मनीतील आघाडीचे वर्तमानपत्र ‘बिल्ड’चे संपादक ‘ज्युलियन रिशेल्ट’ यांनी चीन जर्मनीला किती देणे लागतो, अशी विचारणा करुन १६५ अब्ज डॉलर्सच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. रिशेल्ट यांनी जहाल भाषेत केलेली ही मागणी चर्चेचा विषय ठरली होती.
जर्मनीतून झालेल्या या मागणीबाबत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनकडून याहून मोठी नुकसानभरपाई वसूल करणार असल्याचे सांगितले. ‘अमेरिकेने अद्याप नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केलेली नाही. पण ही रक्कम खूपच मोठी असेल’, असे सूतोवाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले. ही नुकसानभरपाई फक्त अमेरिकेपर्यंत मर्यादीत नसेल. कोरोनाव्हायरसमुळे अमेरिकेबरोबर जगाची देखील हानी झाली आहे. त्यामुळे चीनकडून साऱ्या जगासाठी वसुली करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करणार असल्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले. कोरोनाव्हायरससाठी चीनच जबाबदार आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे अनेक मार्ग उपलब्ध असल्याचे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पीटर नवारॉ यांनी चीनवर ठपका ठेवला. चीन इतर देशांना दुय्यम दर्जाचे टेस्टिंग किट पिरवून या साथीचा फैलाव वाढविण्याचे काम करीत असल्याचा आरोप नवारॉ यांनी केला. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या नुकसानभरपाईच्या इशाऱ्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने टीका केली आहे. अमेरिकेने चीनच्या विरोधात राजकीय डाव खेळणे सोडून आपल्या देशातील जनतेचे जीव वाचविण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे.