मॉस्को – अमेरिकेला युक्रेनमधील युद्ध दीर्घकाळपर्यंत लांबवायचे आहे, असा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत पुतिन यांनी हा आरोप केला. यावेळी रशिया व रशियन जनतेच्या सुरक्षेसाठीच रशियाने युक्रेनमध्ये लष्करी मोहीम सुरू केल्याचेही पुतिन यांनी नमूद केले.
रशिया व युक्रेन युद्धाला पाच महिन्यांहून अधिक काळ उलटला असून रशियाने युक्रेनमधील 20 टक्क्यांहून अधिक भागावर ताबा मिळविण्यात यश मिळविले आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी रशियाची युक्रेनमधील लष्करी उद्दिष्टे बदलू शकतात, असा दावा केला होता. त्यामुळे रशिया युक्रेनमधील अधिकाधिक भाग ताब्यात घेण्याचे प्रयत्न करीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यासाठी रशियाने हल्ल्यांची तीव्रता वाढविल्याचेही समोर येत आहे.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा सुरू केला असून दीर्घकाळपर्यंत रशियाविरोधात संघर्ष करण्यासाठी युक्रेनला सज्ज करण्यात येत आहे. अमेरिका व युरोपिय देश शेवटचा युक्रेनियन असेपर्यंत संघर्ष करीत राहतील, असे दावेही रशियन अधिकाऱ्यांनी केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही क्रिमिआवर ताबा मिळविल्याशिवाय युक्रेन थांबणार नसल्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेवर केलेला आरोप महत्त्वाचा ठरतो. रशियन राष्ट्राध्यक्ष व इतर नेत्यांनी रशिया युक्रेनविरोधात नाही तर नाटोविरोधात संघर्ष करीत असल्याचे यापूर्वी वारंवार सांगितले आहे. पुतिन यांचे वक्तव्यही त्याला दुजोरा देणारे असून युक्रेनमधील युद्धामागे अमेरिका व सहकारी देशच असल्याची जाणीव ते सातत्याने करून देत आहे.