अमेरिकी डॉलर आघाडीचे स्थान गमावण्याचा धोका

- ‘गोल्डमन सॅक्स’ या आघाडीच्या वित्तसंस्थेचा इशारा

आघाडीचे स्थानवॉशिंग्टन – अमेरिकी डॉलर जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रमुख चलन म्हणून असलेले आघाडीचे स्थान गमावण्याचा धोका आहे, असा इशारा गोल्डमन सॅक्स या आघाडीच्या वित्तसंस्थेने दिला. रशियावर लादलेले कठोर निर्बंध व अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील परकीय कर्जाचा बोजा हे घटक डॉलरचा प्रभाव कमी करण्यास कारणीभूत ठरतील, असेही गोल्डमन सॅक्सने आपल्या ‘रिसर्च नोट’मध्ये बजावले आहे. २०व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश पौंडासमोर जी आव्हाने उभी राहिली होती, तीच आव्हाने अमेरिकी डॉलरसमोर असल्याची जाणीवही आघाडीच्या वित्तसंस्थेने करून दिली.

काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच अमेरिकेतील आघाडीच्या अभ्यासगटानेही डॉलरबाबत धोक्याचा इशारा दिला होता. पाश्‍चिमात्य देशांच्या रशियावरील आर्थिक कारवाईनंतर जगातील काही आघाडीचे देश आपल्या परकीय गंगाजळीतील अमेरिकी डॉलरच्या हिश्श्याबाबत फेरविचार करु शकतात, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बजावले होते. तर अमेरिकेकडून निर्बंधांचा होणारा वापर अनेक देशांना डॉलरपासून दूर नेऊ शकतो, असे ‘इन्स्टिट्यूट फॉर द ऍनालिसिस ऑफ ग्लोबल सिक्युरिटी’ने म्हटले होते.

आघाडीचे स्थानअमेरिकेसह जगातील आघाडीची वित्तसंस्था म्हणून ओळखण्यात येणार्‍या गोल्डमन सॅक्सने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या ‘रिसर्च नोट’मध्ये डॉलरबाबत इशारा दिला आहे. ‘ब्रिटीश पौंडाने आघाडीचे चलन म्हणून असलेले स्थान गमाविण्यापूर्वी त्याच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली होती. सध्या डॉलरसमोरही अशाच प्रकारची आव्हाने आहेत. एकेकाळी पौंड जागतिक अर्थव्यवस्थेतील राखीव चलन होता. पण २०व्या शतकाच्या मध्यावर त्याची जागा अमेरिकी डॉलरने घेतली’, याकडे गोल्डमन सॅक्सने लक्ष वेधले.

आघाडीचे स्थान‘अमेरिकेचा जागतिक व्यापारातील हिस्सा तुलनेत खूपच कमी आहे. त्याचवेळी जागतिक स्तरावर होणार्‍या चलनांच्या व्यवहारात मात्र अमेरिकी डॉलरचे वर्चस्व आहे. अमेरिकन परदेशी मालमत्तांच्या आघाडीवरील आपले प्रमुख स्थान गमावले आहे. यामागे अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील परदेशी कर्जाचा वाढता बोजा हे प्रमुख कारण आहे. त्याचवेळी रशिया-युक्रेन युद्धासारख्या भूराजकीय समस्याही अमेरिकी डॉलरसाठी चिंताजनक आहेत. अमेरिका हा मोठा आयातदार देश असून त्याने कर्जाच्या बोज्यात अधिक वाढ होत आहे व ही डॉलरसाठी प्रमुख समस्या ठरु शकते’, असे गोल्डमन सॅक्सच्या अर्थतज्ज्ञांनी बजावले.

जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण वाढत राहिले तर परदेशी गुंतवणूकदार अमेरिकी डॉलरमधील गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करु शकतात, याची जाणीव गोल्डमन सॅक्सच्या अर्थतज्ज्ञांनी करून दिली. गेल्या शतकात ब्रिटीश पौंडाच्या बाबतीतही असेच घडले होते, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. दरम्यान, रशियाविरोधी निर्बंधांमुळे अमेरिकी डॉलर व युरो या चलनांची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचा दावा रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी केला. जगातील प्रमुख चलन म्हणून डॉलरच्या स्थानालाही फटका बसला आहे, असे पेस्कोव्ह यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे. जगातील अधिकाधिक देश स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी उत्सुक असून ही प्रक्रिया आता सुरू झाली असल्याचेही रशियन प्रवक्त्यांनी बजावले.

leave a reply