ब्रुसेल्स – युद्धानंतर युक्रेनची पुनर्बांधणी करण्यासाठी शेकडो अब्ज युरोंची आवश्यकता भासणार आहे आणि याच्यासाठी रशियाच्या परकीय गंगाजळीतील गोठविलेल्या निधीचा वापर करता येईल, असा दावा युरोपिय महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जेोसेप बोरेल यांनी केला. बोरेल यांच्यापूर्वी युक्रेन तसेच अमेरिकेनेही रशियन निधीचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
रशियाने युक्रेनमध्ये लष्करी मोहीम हाती घेतल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात जबर आर्थिक निर्बंध लादले होते. याअंतर्गत रशियाच्या मध्यवर्ती बँकेने परदेशात गुंतवलेल्या राखीव गंगाजळीलाही लक्ष्य करण्यात आले. रशियन बँकेच्या 600 अब्ज डॉलर्सच्या गंगाजळीपैकी 300 अब्ज डॉलर्सचा निधी गोठविण्यात आला होता. याविरोधात रशियन मध्यवर्ती बँकेकडून कायदेशीर कारवाईच्याही हालचाली सुरू आहेत.
मात्र त्यापूर्वीच युक्रेन तसेच अमेरिकेने रशियन गंगाजळीचा वापर युक्रेनच्या पुनर्ऊभारणीसाठी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यापाठोपाठ आता महासंघाच्या परराष्ट्र प्रमुखांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. बोरेल यांनी सदर वक्तव्य करताना, अमेरिका व अफगाणिस्तानचे उदाहरण दिले. तालिबानच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाण सरकारचा निधी गोठविला आहे. या निधीचा वापर थेट अफगाणी जनतेच्या सहाय्यासाठी करण्यात येईल, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला होता.