सेंट्रिफ्यूजेस कार्यान्वित करून इराणकडून अणुकराराचे उल्लंघन सुरूच

- इस्रायली व आखाती माध्यमांची टीका

व्हिएन्ना/तेहरान – ‘इराणने नातांझ आणि फोर्दो या दोन अणुप्रकल्पात नवे सेंट्रिफ्यूजेस कार्यान्वित केले आहेत. यापुढेही आणखी सेंट्रिफ्यूजेस या अणुप्रकल्पात बसविले जातील’, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगातील इराणचे विशेषदूत काझेम घरीबाबादी यांनी केली. इराणने आपल्या अणुप्रकल्पात केलेले बदल म्हणजे २०१५ सालच्या अणुकराराचे उघड उल्लंघन असल्याची टीका इस्रायली व आखाती माध्यमे करू लागली आहेत.

‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगा’ने संयुक्त राष्ट्रसंघाला सुपूर्द केलेल्या छुप्या अहवालात इराणने अणुप्रकल्पांमध्ये दुसर्‍या टप्प्यातील सेंट्रिफ्यूजेस कार्यान्वित केल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये

ही माहिती उघड झाल्यानंतर अणुऊर्जा आयोगाने यावर बोलण्याचे टाळले. पण आयोगातील इराणचे राजदूत घरीबाबादी यांनी उघडपणे सेंट्रिफ्यूजेसची माहिती दिली.

यापैकी, ‘‘नातांझ अणुप्रकल्पातील दोन कॅस्केड्समध्ये ३४८ ‘आयआर२एम’ सेंट्रिफ्यूजेस आहेत. याआधी येथील ‘युएफ६’मध्ये वापरलेल्या ‘आयआर१’ सेंट्रिफ्यूजेसच्या तुलनेत ‘आयआर२एम’ चार पट क्षमतेचे आहेत’’, अशी माहिती घरीबाबादी यांनी दिली. युरेनियमच्या संवर्धनासाठी या प्रगत सेंट्रिफ्यूजेसचा वापर केला जातो.

तर फोर्दो येथील भूमिगत अणुप्रकल्पात ‘आयआर६’ सेंट्रिफ्यूजेस कार्यान्वित केल्याचे इराणने सांगितले. येत्या काळात फोर्दो प्रकल्पात अधिक सेंट्रिफ्यूजेस कार्यान्वित केले जातील, असेही इराणने स्पष्ट केले. २०१५ साली पाश्‍चिमात्य देशांबरोबर झालेल्या अणुकरारानुसार, नातांझ आणि फोर्दो अणुप्रकल्पात युरेनियमचे संवर्धन मर्यादेपलिकडे वाढविण्यास मनाई आहे. पण गेल्या महिन्याभरात इराणने या अणुकरारातील नियमांचे उल्लंघन केले आहे. इस्रायली आणि आखाती माध्यमे इराण करीत असलेल्या या उल्लंघनावर टीका करीत आहेत.

दरम्यान, आपल्या अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन आणि सेंट्रिफ्यूजेस कार्यान्वित करून इराण अमेरिकेच्या बायडेन प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा केला जातो. बायडेन प्रशासनाने देखील इराणबरोबर चर्चेसाठी हालचाली वाढविल्या आहेत.

leave a reply