इराणविरोधात पुकारलेले युद्ध अमेरिका, इस्रायलसाठीच दफनभूमी ठरेल

- इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रमुखांचा इशारा

दफनभूमीतेहरान – ‘इराणमध्ये दंगली भडकवून, कलह माजवून विभाजन करण्याचे कारस्थान अमेरिका, इस्रायली राजवट आणि त्यांच्या टोळ्यांनी आखला आहे. पण इराणच्या शत्रूंनी कितीही ताकद वापरली आणि अगदी महायुद्ध सुरू केले तरी हे युद्ध अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या साथीदारांची दफनभूमी ठरेल’, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी दिला. इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रमुखांची ही धमकी अत्यंत गंभीर असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

गेल्या दहा आठवड्यांपासून इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. इराणच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या निदर्शनांना समर्थन मिळत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचे पडसाद उमटू लागले आहेत. कुठल्याही नेतृत्वाशिवाय अडीच महिने सुरू असलेली ही निदर्शने हाणून पाडण्यात इराणच्या राजवटीला अपयश मिळत असल्याचे आंतराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत. इराणने ही निदर्शने म्हणजे दंगली आणि निदर्शकांना दहशतवादी ठरविले आहे. तसेच इराकमध्ये आश्रय घेतलेल्या इराणद्वेष्ट्या कुर्द संघटना या दंगलीमागे असल्याचा आरोप इराण करीत आहे.
अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबिया या दंगलखोरांना, दहशतवाद्यांना शस्त्र पुरवित असल्याचा ठपका इराणने ठेवला होता. तसेच काचेच्या महालात राहणाऱ्या सौदीच्या नेतृत्त्वाने निदर्शकांना सहाय्य देणे थांबविले नाही तर त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असे इराणने बजावले होते. तर दोन दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी पाश्चिमात्य देशांवर टीका करून निदर्शकांवर कठोर कारवाई करणाऱ्या बसिज मिलिशियाला प्रोत्साहन दिले. रविवारी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे प्रमुख मेजर जनरल सलामी यांनी याच बसिज मिलिशियाला संबोधित करताना पाश्चिमात्य मित्रदेशांना धमकावले.

दफनभूमीअमेरिका, ब्रिटन, इस्रायल, जर्मनी, फ्रान्स आणि सौदीचे राजघराणे आपल्या नियंत्रणाखालील माध्यमांचा वापर करून इराणमध्ये फूट पाडण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कारस्थानांवर इराणची करडी नजर आहे. त्यामुळे शत्रूदेशांनी इराणमधील सरकार पाडण्यासाठी कितीही स्वप्ने पाहिली आणि भ्रमजाल तयार केले, तरी इराण व इराणचे मजबूत सरकार त्यांच्यासमोर झुकणार नाही, हे त्यांनाही ठाऊक आहे. इस्रायल इराणचे काहीही वाकडे करू शकत नाही. अमेरिका, ब्रिटन, इस्रायल आणि सौदी एका बाजूला आणि इराण व इराणची सुरक्षा यंत्रणा दुसऱ्या बाजूला असली तरी पाश्चिमात्य देश इराणचे नुकसान करू शकत नाहीत’, असा दावा मेजर जनरल सलामी यांनी केला.

यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रमुखांनी इतिहासाचे दाखले देऊन अमेरिका आणि ब्रिटनवर हल्ला चढविला. ‘कितीतरी अनेक युद्धांमध्ये अमेरिकेने लाखो जणांची कत्तल केली, अमानवी छळवणूक केली आणि इतर देशांना सर्वसंहारक शस्त्रास्त्रे देखील पुरविले. तर ब्रिटनने जगभरात मोठमोठी हत्याकांडे घडविली आणि वसाहतवादाची मानसिकता जोपासली. हेच देश आज इराणची हानी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पण ते त्यांच्या इराद्यांमध्ये अजिबात यशस्वी होणार नाहीत’, असे सलामी पुढे म्हणाले.

दरम्यान, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रमुखांनी इस्रायल, सौदी व पाश्चिमात्य देशांवरील कारवाईची माहिती दिली नाही. पण लवकरच इराणबरोबर प्रत्यक्ष युद्ध भडकेल, याची जाणीव इस्रायली लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आपल्या जवानांना करून देत आहेत. तर इराणविरोधात कारवाई करण्याची हीच योग्य वेळ असल्याचा दावा इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख करीत आहेत.

हिंदी

leave a reply