आफ्रिकेतील सुदान व इथिओपियामध्ये युद्ध भडकले

खार्तुम/आदिस अबाबा – सुदानने सीमावादावरून इथिओपियाशी युद्ध पुकारले आहे, अशी माहिती सुदानी लष्कराने दिली आहे. सुदान व इथिओपिया सीमेवरील ‘अल-फश्का’ प्रांतावर सुदानी लष्कराने ताबा मिळविल्याचा दावाही करण्यात आला. इथिओपिया सरकारने सुदानच्या दाव्यांना दुजोरा दिला असून चर्चेने वाद सुटला नाही तर इथिओपियाचे लष्कर प्रतिहल्ला चढवेल, असा इशारा दिला आहे. सुदानने सुरू केलेल्या युद्धामागे इजिप्तची फूस असल्याचे आरोप इथिओपियातून करण्यात येत आहेत.

सुदान व इथिओपियामध्ये १६०० किलोमीटर्सची सीमारेषा असून त्यातील काही भाग अजूनही निश्‍चित करण्यात आलेला नाही. सुदानच्या ‘अल-फश्का’ प्रांताची ६०० किलोमीटरची सीमारेषा इथिओपियाला जोडलेली असून हा कायम वादाचा मुद्दा राहिला आहे. ‘अल-फश्का’ पारंपारिकदृष्ट्या सुदानचा भाग असला तरी इथिओपियातील राजवटींनी आपल्या जनतेला त्यात घुसखोरी करण्याची मोकळीक दिली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी इथिओपियाने आपल्या लष्करी तुकड्याही तैनात केल्या होत्या.

सुदानचे माजी लष्करी हुकुमशहा ‘ओमर अल-बशिर’ यांनी या वादाकडे फारसे लक्ष दिले नव्हते. इथिओपियातील ‘तिगरे’वंशिय व त्यांचे वर्चस्व असलेल्या सरकारशी असलेले चांगले संबंध हे त्यामागील कारण होते. मात्र गेल्या दोन वर्षात सुदान व इथिओपियातील राजवटींमध्ये झालेल्या बदलांमुळे सीमावादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. इथिओपियाचे पंतप्रधान अबि अहमद यांनी गेल्या महिन्यात तिगरे प्रांताविरोधात उघड लष्करी संघर्ष छेडला होता. या संघर्षात सुदानने तिगरेतील बंडखोर व जनतेला सहाय्य पुरविल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आता सीमावादाचा मुद्दा पुढे करण्यात आल्याचे दिसत आहे.

‘अल-फश्का’मध्ये सुदानने लष्करी तुकड्या पाठवून इथिओपियन नागरिकांची हकालपट्टी सुरू केली आहे. या प्रांतातील ६० टक्क्यांहून अधिक भागावर सुदानच्या लष्कराने ताबा मिळविल्याचे सांगण्यात येते. सुदानने ‘अल-फश्का’वर पूर्ण ताबा मिळविण्याचा इशारा दिला असून त्यानंतर इथिओपियाशी चर्चा करु असे बजावले आहे. इथिओपिया सरकारने त्याला प्रत्युत्तर देताना, आपले लष्कर सार्वभौमत्त्वाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी इतर देश इथिओपिया व सुदानमध्ये तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप इथिओपियाच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

इथिओपियातील माध्यमे तसेच सोशल मीडियातूनही सुदानच्या लष्करी कारवाईवर टीका करण्यात येत असून त्यामागे इजिप्तचा हात असल्याचे दावे करण्यात येत आहेत. इजिप्त, सुदान व इथिओपियामध्ये सध्या ‘नाईल’ नदीच्या वाटपावरून वाद सुरू आहे. इजिप्तने सुदानच्या काही मागण्या मान्य करण्यास होकार दिला असला तरी इथिओपियाच्या मागण्या पूर्णपणे फेटाळल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून हा वाद सातत्याने चिघळत असून अमेरिकेनेही त्यात मध्यस्थीसाठी प्रयत्न केल्याचे मानले जाते.

काही महिन्यांपूर्वी या मुद्यावर झालेली चर्चा कोणत्याही तोडग्याविना अपयशी ठरली होती. त्यानंतर इजिप्तने सुदानच्या सहकार्याने इथिओपियाला एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. इथिओपियाच्या सरकारने तिगरे प्रांतात संघर्ष सुरू केल्यानंतर इजिप्तने सुदानच्या सहाय्याने व्यापक लष्करी सरावही केला होता. या सरावाचा उद्देश इथिओपियावर दबाव टाकण्याचाच होता, असे सांगण्यात येते. या सरावानंतरच सुदानने ‘अल-फश्का’मध्ये लष्करी तुकड्या धाडून कारवाई सुरू केली होती. त्यामुळे सुदान व इथिओपियामध्ये भडकलेल्या युद्धामागे इजिप्त सूत्रे हलवित असावा, असा दावा इथिओपियातील विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply