तैवानसाठी चीनशी युद्ध करू, पण ‘वन चायना’ सोडणार नाही

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन व व्हाईट हाऊसची परस्परविरोधी विधाने

‘वन चायना’वॉशिंग्टन – तैवानवर आकस्मिक हल्ला झाला, तर अमेरिकी लष्कर तैवानच्या बचावासाठी उतरेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एका मुलाखती दरम्यान घोषित केले. त्यानंतर तैवानसाठी अमेरिका-चीन संघर्ष पेटणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र यावर चीनची जहाल प्रतिक्रिया आल्यानंतर बायडेन यांच्या विधानावर व्हाईट हाऊसने सारवासारव केली. अमेरिका ‘वन चायना पॉलिसी’शी बांधिल असून यात कुठलाही बदल झाला नसल्याचा खुलासा व्हाईट हाऊसला द्यावा लागला. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या सिनेटने तैवानसाठी कोट्यवधी डॉलर्सच्या लष्करी सहाय्याची घोषणा केली होती. यानुसार, अमेरिका तैवानला विनाशिकाभेदी तसेच हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे पुरविणार आहे. चीनपासून तैवानला धोका असल्याचे अधोरेखित करून पेंटॅगॉनने या लष्करी सहाय्याचे समर्थन केले होते. याच सुमारास सीआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना, 2027 साली चीन तैवानचा ताबा घेण्याचा प्रयत्न करील, असा दावा केला होता.

पण तैवानला देण्यात येणाऱ्या या सहाय्यावर खवळलेल्या चीनने शस्त्रास्त्रनिर्मिती करणाऱ्या अमेरिकेच्या बोईंग आणि रेदॉन या कंपन्यांच्या सीईओंवर निर्बंधांची घोषणा केली होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये चीनने अमेरिकेवर दुसऱ्यांदा असे निर्बंध लादले होते. याआधी तैवानचा दौरा करणाऱ्या नॅन्सी पेलोसी यांच्यावर चीनने निर्बंधांची कारवाई केली होती. त्याने अमेरिका-चीन संबंध अधिकच तणावपूर्ण बनल्याचे दिसत होते.

अशा परिस्थितीत, अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तैवानबाबत नवी घोषणा केली. तैवानवर आकस्मिक हल्ला चढविलाच तर अमेरिकेचे लष्कर तैवानच्या बचावासाठी चीनविरोधात संघर्षात उतरेल का, असा प्रश्न पत्रकाराने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना केला. यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘हो, नक्कीच! चीनच्या आक्रमकतेविरोधात अमेरिका तैवानचा बचाव करील’ अशी प्रतिक्रिया दिली. ‘युक्रेनबाबत घडले नाही, ते चीनने तैवानमध्ये घुसखोरी केल्यावर दिसेल? अमेरिकेचे लष्कर, जनता तैवानच्या बाजूने उभी राहील?’, या आणखी एका प्रश्नावर बायडेन यांनी होकारार्थी उत्तर दिले.

याची गंभीर दखल घेऊन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला ‘वन चायना पॉलिसी’ची आठवण करून दिली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची विधाने ‘वन चायना पॉलिसी’ तसेच तैवानबाबतच्या तीन नियमांचे उल्लंघन करणारी ठरतात, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी केली. तसेच अमेरिका-चीन संबंधांवर याचे परिणाम होतील, असेही चीनने बजावले. यानंतर व्हाईट हाऊसने बायडेन यांच्या विधानांचा विपर्यास झाल्याचे सांगून अमेरिका वन चायना पॉलिसीशी बांधिल असल्याचे सांगितले.

दरम्यान, याआधी मे महिन्यात जपानच्या दौऱ्यावर असताना बायडेन यांनी तैवानसाठी चीनविरोधात युद्धात उतरण्याची घोषणा केली होती. तेव्हाही व्हाईट हाऊसला त्यावर सारवासारव करून खुलासे द्यावे लागले होते. त्यानंतर जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी बायडेन यांचे तैवानबाबतचे धोरण धरसोडीचे असल्याची टीक केली होती. युक्रेनमध्ये केलेल्या चुकीची पुनरावृत्ती अमेरिकेने तैवानबाबत करू नये, असे ॲबे यांनी बजावले होते.

leave a reply