मॉस्को/वॉशिंग्टन – नवी जागतिक व्यवस्था प्रस्थापित होईपर्यंत रशिया व अमेरिकेत सातत्याने संघर्ष सुरु राहिल, असा दावा रशियाचे वरिष्ठ संसद सदस्य अलेक्सी पुश्कोव्ह यांनी केला आहे. नव्या व्यवस्थेत अमेरिका कमकुवत व प्रभावहिन असेल, असेही त्यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे. २०२२ हे वर्ष अमेरिका व रशियामधील संबंधांमध्ये आणीबाणीची वेळ निर्माण करणारे वर्ष ठरेल, असा इशाराही पुश्कोव्ह यांनी दिला आहे. पुश्कोव्ह हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे निकटवर्तिय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.
युक्रेन, इंधन, सायबरहल्ले, इराण, अफगाणिस्तान अशा अनेक मुद्यांवरून सध्या रशिया व अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. युक्रेनच्या मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये अप्रत्यक्ष संघर्ष भडकण्याचेही संकेत देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाच्या संसद सदस्यांनी केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत.
‘अमेरिका हा वर्चस्ववादी देश आहे, मात्र हा देश हळुहळू आपले स्थान गमावत चालला आहे. आखात, अफगाणिस्तान अशा सर्व जागी अमेरिकेला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील गट रशिया व चीनशी एकाच वेळी संघर्ष करून आपला प्रभाव कायम राखण्याची खटपट करीत आहेत. त्यामुळे अमेरिकेबरोबरच जगातील इतर भागांमध्येही चिंतेचे वातावरण तयार झाले आहे’, असा दावा पुश्कोव्ह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला.
‘अमेरिका आता रशियाला दुय्यम सत्ता म्हणून नाही तर प्रमुख सत्ता म्हणून बघते आहे. त्यामुळेच २०२२ मध्ये अमेरिकेचे बायडेन प्रशासन चीन नाही तर रशिया मुख्य समस्या असल्याचे सांगत आहे. अमेरिका व रशिया संबंधांसाठी २०२२ हे वर्ष आणीबाणीची वेळ निर्माण करणारे वर्ष ठरु शकते’, असे रशियन संसद सदस्य पुश्कोव्ह यांनी बजावले. अमेरिकेला आता रशियाची समस्या सोडवायची असून त्यासाठी युक्रेनचा वापर करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘जग चालविण्याची क्षमता फक्त अमेरिकेकडेच आहे, असे अमेरिकेच्या राजकीय व आर्थिक क्षेत्रावर पकड असणार्या गटाला वाटते. त्यामुळे ते इतर कोणाचीही जगावर पकड बसू देत नाहीत. अशा परिस्थितीत कमकुवत व प्रभावहिन अमेरिका असणारी नवी जागतिक निर्माण होईपर्यंत रशिया आणि अमेरिकेतील संघर्ष सुरूच राहतील’, असा दावा पुश्कोव्ह यांनी केला.
दरम्यान, रशिया व युक्रेनमधील संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, नाटो युक्रेनमध्ये लढण्यासाठी लष्कर तैनात करणार नाही, असे नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी स्पष्ट केले. नाटोचा सदस्य असणे व भागीदार देश असणे यात फरक असून नाटो युक्रेनला अतिरिक्त सहाय्य पुरवू शकतो, असे स्टॉल्टनबर्ग यांनी सांगितले. युक्रेनमधील तैनातीवरून नाटो तसेच युरोपिय महासंघात मतभेद असल्याचे सातत्याने समोर येत असून नाटो प्रमुखांचे वक्तव्य त्याला दुजोरा देणारे ठरत आहे. नाटो लष्करी तैनाती नाकारत असतानाच युरोपिय महासंघाने ‘नॉर्ड स्ट्रीम२’ व ‘स्विफ्ट’वरून रशियाला इशारा दिला आहे. महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी, रशियाला आंतरराष्ट्रीय बॅकिंग व्यवहारांपासून तोडण्याचा इशारा दिला असून ‘नॉर्ड स्ट्रीम२’ इंधनवाहिनीची मान्यता रोखण्याबाबतही बजावले आहे.