मॉस्को – रशियाचे अमेरिका व युरोपिय महासंघाबरोबरील संबंध रसातळाला पोहोचले असून यासाठी संबंधित पाश्चिमात्य देशच जबाबदार असल्याची टीका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली. बुधवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिका व महासंघाच्या राजदूतांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युक्रेनमधील सध्याच्या संघर्षासाठी अमेरिकेने २०१४ सालच्या आंदोलनाला दिलेले समर्थन कारणीभूत असल्याचा आरोप केला. तर युरोपिय महासंघाने सहकार्याची भूमिका सोडून रशियाविरोधात भूराजकीय संघर्ष करण्याचे धोरण स्वीकारले असून त्यामुळेच दोन बाजूंमधील संबंध अधिकाधिक बिघडत असल्याचे पुतिन यांनी बजावले.
रशिया-युक्रेन संघर्षाला सुरुवात झाल्यापासून अमेरिकेसह युरोपिय देशांनी रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंधांचा मारा करण्यात आला असून परकीय गंगाजळीही गोठविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाला एकाकी पाडण्यासाठी अमेरिका व युरोप जगातील इतर देशांवरही दबावतंत्राचा वापर करीत आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन संघर्ष दोन देशांमधील लढाई राहिली नसून त्याला रशिया विरुद्ध पाश्चिमात्य देश असे स्वरुप आले आहे.
गेल्या काही दिवसात रशियाच्या विविध नेत्यांकडून याचा सातत्याने उल्लेख होत आहे. रशियाने आपल्या नव्या परराष्ट्र धोरणातही याला प्राधान्य दिले असून पाश्चिमात्य जगताने रशियाविरोधात नवे हायब्रिड वॉर सुरू केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे रशियाही आपल्या धोरणात बदल करीत असून पाश्चिमात्यांविरोधातील संघर्ष दीर्घकाळासाठी चालू राहिल, असे संकेत वरिष्ठ रशियन नेत्यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेच्या राजदूत लिन ट्रेसी व युरोपिय महासंघाचे नवे राजदूत रोलँड गॅलहॅराग यांच्याशी चर्चा केली. यावेळी अमेरिकी राजदूतांशी बोलताना पुतिन यांनी २०१४ साली युक्रेनमध्ये घडविण्यात आलेल्या ‘कलर रिव्होल्युशन’चा उघड उल्लेख केला. ही घटनाच सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षासाठी कारणीभूत असल्याचे पुतिन यांनी बजावले. याबरोबरच नंतरच्या काळात अमेरिकेने घेतलेल्या निर्णयांमुळेच दोन देशांमधील संबंध रसातळाला पोहोचल्याचा ठपका पुतिन यांनी ठेवला.
अमेरिका व रशियामधील संबंधांवर जागतिक सुरक्षा तसेच स्थैर्य अवलंबून असल्याची जाणीवही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी करून दिली. अमेरिकी राजदूतांपाठोपाठ पुतिन यांनी युरोपिय महासंघाच्या नव्या राजदूतांशीही संवाद साधला. राजदूत रोलँड गॅलहॅराग हे फ्रेंच अधिकारी असून पुतिन यांनी फ्रान्स व रशियामधील संबंधांचा उल्लेख केला. त्याचवेळी महासंघाने अमेरिकेच्या प्रभावाखाली येऊन रशियाबरोबर संघर्षाचे धोरण स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी केला.