वॉशिंग्टन – या आठवड्याच्या सुरूवातीला रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह इतर शहरांवर शंभराहून अधिक क्षेपणास्त्रे व कामाकाझी ड्रोन्सचा मारा केला होता. यामुळे युक्रेनसह युक्रेनची पाठराखण करणाऱ्या पाश्चिमात्य देशांनाही जबर धक्का बसला होता. त्यानंतर अमेरिकेने युक्रेनला अधिक शस्त्रास्त्रे पुरविण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार बायडेन प्रशासनाने सुमारे 72 कोटी, 50 लाख डॉलर्सची अतिरिक्त शस्त्रे युक्रेनला पुरविण्याचा निर्णय घेतला. व्हाईट हाऊसने याची घोषणा केली आहे. याआधी युरोपिय देशांनी देखील युक्रेनला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे व हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्याचे जाहीर केले आहे.
याआधी अमेरिकेने युक्रेनला सुमारे 20 हाय मोबिलिटी रॉकेट लाँचर सिस्टीम ‘एचआयएमएआरएस’ पुरविल्या होत्या. व्हाईट हाऊसने केलेल्या नव्या घोषणेनुसार आणखी 18 एचआयएमएआरएस यंत्रणा युक्रेनला पुरविल्या जातील. यामुळे रशियन सैन्याला लक्ष्य करणे युक्रेनी लष्कराला अधिक सोपे जाईल व यामुळे युक्रेनच्या विरोधात लष्करी हालचाली करणे रशियन सैन्यासाठी अधिकच अवघड बनेल, असे दावे केले जातात. या आठवड्यात ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड व कॅनडा या देशांनीही युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा पुरवठा करण्याची घोषणा केलेली आहे.
ब्रिटनने युक्रेनला विमानभेदी ‘एनएएसएएम’ यंत्रणा पुरविण्याचे जाहीर केले आहे. याबरोबरच युक्रेनी लष्कराला शेकडो ड्रोन्स व 18 हॉवित्झर तोफांनी सज्ज करण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. तर जर्मनी आयआरआयएस-टी यंत्रणा पुरवून युक्रेनची हवाई सुरक्षा अधिक भक्कम करणार आहे. तसेच फ्रान्सने युक्रेनला विमानभेदी यंत्रणा व क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. नेदरलँडस् व कॅनडा या देशांनी देखील युक्रेनला अत्याधुनिक संरक्षणसाहित्य व ड्रोन्स तसेच संपर्कयंत्रणा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका व पाश्चिमात्य देश युक्रेनी लष्कराला ही शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य पुरवित असले तरी त्याचा सुयोग्य वापर करण्याची क्षमता व प्रशिक्षण युक्रेनी लष्कराकडे नाही, अशी कबुली अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली. यामुळेच अत्याधुनिक व प्रभावी शस्त्रे असताना देखील युक्रेनी लष्कराला रशियन सैन्याच्या विरोधात अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे केवळ पाश्चिमात्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांवर विसंबून युक्रेनच्या लष्कराला रशियन सैन्यावर कुरघोडी करता येणे शक्य नसल्याचे दिसते. तरीही गेल्या काही आठवड्यात युक्रेनच्या लष्कराला रशियाच्या विरोधात मिळालेल्या यशात पाश्चिमात्यांनी पुरविलेल्या शस्त्रांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचा वापर करणारे नक्की युक्रेनी लष्कराचेच जवान आहेत का, असा प्रश्न काही विश्लेषक विचारत आहेत. युक्रेनी लष्कराच्या बाजूने पाश्चिमात्यांचे कंत्राटी सैनिक लढत असल्याचा तर्क विश्लेषकांनी केलेल्या या प्रश्नामागे आहे.