सेऊल – ‘आपली जनता, प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्त्व संरक्षित करण्यासाठी उत्तर कोरिया अण्वस्त्रांची निर्मिती करीत आहे. उत्तर कोरियाला या शतकातील सर्वाधिक सामर्थ्यशाली आण्विक ताकद बनविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे’, असा इशारा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी दिला. गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने अमेरिका व मित्रदेशांना अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी दिली होती. तर रविवारच्या इशाऱ्याद्वारे उत्तर कोरियाने अणुचाचणीची वेळ जवळ येत असल्याचे संकेत दिले आहेत.
आपल्याकडे जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सामरिक शस्त्र आहे, हे गेल्या आठवड्यात अमेरिकेपर्यंत धडक देऊ शकणाऱ्या हॉसाँग-१७ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियाने दाखवून दिले, अशी घोषणा किम यांनी आपल्या जवानांशी बोलताना केली. ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आण्विक स्फोटकांनी सज्ज करण्याचे तंत्रज्ञानही उत्तर कोरियाच्या संशोधकांनी मिळविल्याचा दावा किम जाँग-उन यांनी केला.
उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची केलेली निर्मिती आणि आण्विक स्फोटकांचा साठा, हे जगाच्या सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक असल्याचे अमेरिका बजावत आहे. उत्तर कोरियाविरोधी कारवाईसाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. पण चीन व रशियाने उत्तर कोरियाला या कारवाईपासून वाचविले. यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम यांच्याशी चर्चा केल्याची बातमी आली होती.
हिंदी