‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’ चीनला महाग पडेल

- माजी राजदूतांचे टीकास्त्र

‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’बीजिंग – अमेरिकेतील चीनचे माजी राजदूत कुई तिआन्की यांनी चीनच्या राजवटीकडून वापरण्यात येणार्‍या ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’वर टीकास्त्र सोडले आहे. क्रोध आणि टकरा मारण्यावर आधारलेले हे युद्ध चीनला सहाय्यक ठरणारे नसल्याचा दावा माजी राजदूतांनी केला. अमेरिकेबरोबरील संबंधांमध्ये ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’चा वापर न करता स्थिती अधिक काळजीपूर्वक हाताळायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तिआन्की हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विश्‍वासातील अधिकारी म्हणून ओळखण्यात येत असल्याने त्यांनी केलेली टीका लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

कुई तिआन्की हे २०१३ ते २०२१ अशी सलग आठ वर्षे चीनचे अमेरिकेतील राजदूत म्हणून कार्यरत होते. अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांची कारकिर्द जवळून बघणारे चिनी राजदूत म्हणून ते ओळखले जातात. ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना तिआन्कि यांना चीनकडून मुदतवाढ देण्यात आली होती. अमेरिकेत सर्वाधिक काळ सक्रिय असलेले चिनी राजदूत म्हणून तिआन्की यांना चीनच्या राजनैतिक वर्तुळात विशेष स्थान आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी चीनमधील एका अनौपचारिक कार्यक्रमात चीनच्याच राजनैतिक धोरणावर केलेली टीका महत्त्वाची ठरते.

‘ज्या युद्धाची आपण तयारीच केलेली नाही व जे युद्ध जिंकण्याची खात्री नाही ते युद्ध केवळ भावनांच्या जोरावर लढण्यात काहीच अर्थ नाही. हे क्रोधाचे प्रदर्शन व टकरा मारण्याच्या वृत्तीचे निदर्शक ठरते. आपण जे काही मिळवले आहे, ते इतरांमुळे गमावता कामा नये. आपला निष्काळजीपणा किंवा अकार्यक्षमतेमुळे नुकसान होऊ देऊ नकात. गुंतागुंतीच्या परिस्थितीत आपण नेहमीच देशाचे व्यापक हित लक्षात ठेवायला हवे. केवळ इंटरनेट सेलिब्रिटी बनण्याचा विचार करु नये’, अशा शब्दात कुई यांनी चीनच्या राजनैतिक अधिकार्‍यांकडून करण्यात येणार्‍या आक्रमक वक्तव्यांना लक्ष्य केले.

अमेरिकेकडून देण्यात येणार्‍या चिथावण्यांमध्ये वाहून जाणे चीनने थांबवायला हवे, असा सल्लाही माजी राजदूतांनी दिला आहे. चीनने अमेरिकेबरोबरच्या संबंधांबाबत अधिक दक्षता बाळगण्याची गरज असल्याचेही कुई तिआन्कि यांनी बजावले. ‘अमेरिकी निर्बंधांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याऐवजी चीनच्या राजवटीने अधिक दूरदर्शी धोरण राबविण्याची आवश्यकता आहे. चीनमधील अमेरिकी उद्योग व कंपन्यांना चीनमध्येच ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अमेरिकी प्रशासनाने त्यांना नियमांमध्ये अडकवून चीन सोडून मायदेशी येण्यास भाग पाडणे योग्य ठरणार नाही’, या शब्दात कुई यांनी चिनी धोरणावर ताशेरे ओढले.

गेल्या काही वर्षात चीनचे परदेशातील राजदूत, वरिष्ठ राजनैतिक अधिकारी व नेते अत्यंत जहाल भाषेचा वापर करीत आहेत. पाश्‍चात्य देशांसह इतर कोणत्याही देशाने चीनविरोधात निर्णय घेतल्यास त्यावर आक्रमक शब्दात टीकास्त्र सोडून धमकावले जात आहे. चीनचे हे धोरण ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’ म्हणून ओळखण्यात येत असून यामागे जिनपिंग यांची आग्रही भूमिकाच कारणीभूत असल्याचे मानले जाते. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातील वरिष्ठ नेते यांग जिएची व परराष्ट्रमंत्री वँग यी ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’चे पुरस्कर्ते असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply