भारतीय व इस्रायलींच्या एकत्र येण्याने अद्भूत गोष्टी घडतात

- इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट

बंगळुरू – ‘अचाट क्षमता असलेले नेहमीच विस्मयचकीत करणार्‍या गोष्टी घडवू शकतात. भारत हा जगातील मोठ्या देशांपैकी एक असून भारताची अर्थव्यवस्था आणि डिजिटल क्षेत्रातील कौशल्य वादातीत आहे. त्याचवेळी इस्रायल हा संशोधन क्षेत्रातील अग्रेसर देश आहे. म्हणून जेव्हा भारतीय आणि इस्रायली एकत्र येतात, तेव्हा अद्भूत गोष्टी घडतात’, असे सांगून इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी भारत व इस्रायलमधील सहकार्याची महती स्पष्ट केली. लवकरच पंतप्रधान बेनेट भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत. तर सध्या भारताचे लष्करप्रमुख इस्रायलच्या भेटीवर आहेत. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायली पंतप्रधानांचे हे उद्गार सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणारे ठरतात.

भारतीय व इस्रायलींच्या एकत्र येण्याने अद्भूत गोष्टी घडतात - इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट‘बंगळुरू टेक समिट-बीटीएस २०२१’ला दिलेल्या व्हिडिओ संदेशात इस्रायलच्या पंतप्रधानांनी भारताची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘तंत्रज्ञानाकडे केवळ जीवन सुलभ करण्याची क्षमता नाही, तर जीवन वाचविण्याचे सामर्थ्यही आहे. जर भारत आणि इस्रायल या दोघांनीही आपली शक्ती व बुद्धी पणाला लावून या आघाडीवर सहकार्य विकसित केले, तर अफाट शक्यता व अमर्याद संधी समोर येतील’, असा विश्‍वास पंतप्रधान बेनेट यांनी व्यक्त केला. याआधी भारतीय व इस्रायलींनी एकत्र येऊन अतुलनीय गोष्टी घडविलेल्या आहेत, याचा दाखला देता येईल, असे सांगून पंतप्रधान बेनेट यांनी स्वत:च्या अनुभवाचा दाखला दिला. आपण सीओटा नावाची कंपनी चालवित होतो आणि कंपनीचे एका भारतीय कंपनीबरोबर विलनीकरण झाले आणि अमेरिकेच्या मॅनहॅटनमध्ये एकत्र काम करू लागलो. दोन्ही संस्कृतींचे हा समन्वय जबरदस्त ठरला होता, असे पंतप्रधान बेनेट म्हणाले.

या अनुभवातून आशावादी व स्मार्ट असलेल्यांबरोबर काम करण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आले, असे पंतप्रधान बेनेट पुढे म्हणाले. भारतीयांचे व इस्रायलींचे एकत्र येणे म्हणजे सर्जनशीलता, कल्पकता आणि चिकाटी यांचा संगम ठरेल. यातून अतुलनीय गोष्टी घडविल्या जाऊ शकतात, असा विश्‍वास इस्रायली पंतप्रधानांनी व्यक्त केला. दरम्यान, सध्या भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे इस्रायलच्या पाच दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. भारत आणि इस्रायलमधील लष्करी सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचा हा दौरा अतिशय प्रभावी ठरेल, असे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी भारताची डीआरडीओ व इस्रायलची डीडीआरडी यांच्यात आर्टिफिशल इंटेलिजन्स, क्वांटम तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ड्रोन्स, फोटोनिक्स आणि बायोसेन्सिंग इत्यादी क्षेत्रातील संशोधनावर सहकार्य करार संपन्न झाला आहे. यामुळे भारताचे संरक्षणविषयक सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढणार असून भारत फार मोठे लष्करी सामर्थ्य असलेला देश म्हणून उदयाला येईल, असे दावे केले जातात. विशेषत: पाकिस्तानातील काही पत्रकारांनी भारत व इस्रायलमधील या सहकार्याचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

लवकरच इस्रायलचे पंतप्रधान भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत. दोन्ही देशांमधील सर्वच आघाड्यांवरील सहकार्य यामुळे अधिकच विकसित होईल, असे संकेत मिळत आहेत. भारताबरोबरील धोरणात्मक सहकार्य वाढवत राहण्याचा निर्णय इस्रायलच्या आधीच्या सरकारनेही घेतला होता. सत्ताबदलानंतर पंतप्रधान बेनेट यांनीही हे धोरण कायम ठेवले असून भारताबरोबरील सहकार्याला इस्रायल सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे दाखवून दिले आहे. लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या इस्रायल दौर्‍याचे स्वागत करीत असताना, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी जनरल नरवणे यांचा फोटो सोशल मीडियावर दिला होता. यावेळी जनरल नरवणे यांच्या मागे, पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी जनरल नियाझी यांनी १९७१ सालच्या युद्धातील पराभवानंतर शरणांगतीच्या करारावर स्वाक्षरी करतानाचा फोटोग्राफ लावलेला होता. सोशल मीडियावर भारतीयांनी इस्रायली राजदूतांच्या या संदेशाचे जोरदार स्वागत केले होते.

leave a reply