जग प्रचंड मोठ्या संकटाच्या दिशेने वाटचाल करीत आहे

- वरिष्ठ अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांचा इशारा

नुरिअल रुबिनीवॉशिंग्टन – ‘भविष्यात मानवी समाजाला यापूर्वी न पाहिलेल्या मोठ्या धोक्यांना तोंड द्यावे लागणार आहे. हे धोके हळुहळू तयार होत आहेत आणि आपण ते टाळण्यासाठी काहीच करीत नाही’, असा इशारा अमेरिकेतील आघाडीचे अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांनी दिला. यावेळी रुबिनी यांनी पुढील काळातील धोक्यांची तुलना मंद गतीने होणाऱ्या रेल्वेगाडीच्या अपघाताशी (स्लो मोशन ट्रेन रेक) केली. संपूर्ण जग अशा अपघाताच्या दिशने चालले असल्याचे अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी बजावले. गेल्याच महिन्यात अमेरिकेतील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ मोहम्मद अल-एरिअन यांनी, जागतिक अर्थव्यवस्थेच्या संरचनेत मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत, असा इशारा दिला होता.

चीनमधील कोरोनाची साथ, जागतिक पुरवठा साखळीचे संकट व त्यापाठोपाठ सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेसह इतर क्षेत्रांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यात संभाव्य आर्थिक मंदीसह भूराजकीय पातळीवर बदलणारी समीकरणे व तंत्रज्ञान क्षेत्रातील उलथापालथींचाही समावेश आहे. हे बदल होत असताना मानवी समाजाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल, याकडे अनेक अर्थतज्ज्ञ व विश्लेषक लक्ष वेधत आहेत. रुबिनी यांचा इशाराही त्याचाच भाग ठरतो.

नुरिअल रुबिनी‘महागाईचा भडका, आर्टिफिशल इंटेलिजन्स, हवामानबदल आणि तिसऱ्या महायुद्धाचा धोका हे सर्व घटक जगावर मोठा परिणाम घडविणारे आहेत. मानवी समाजाने आता कायम हाय अलर्टवर राहण्याची सवय करुन घ्यायला हवी’, असे रुबिनी यांनी बजावले. थोडेसे नशिब, जागतिक सहकार्य व अभूतपूर्व आर्थिक विकासदर या तीन गोष्टीच मोठ्या संकटातून बाहेर काढून सकारात्मक परिणाम घडवू शकतात, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

आर्थिक संकट अधिकाधिक गंभीर होत असतानाही त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणारे जगातील राजकीय नेते व अर्थतज्ज्ञ पद्धतशीरपणे चुका करीत आहेत. महागाईविरोधातील लढाई त्यांनी फारशा गांभीर्याने घेतली नाही व त्यांचे प्रयत्नही तसे नव्हते. सहा महिनेच मंदी राहिल व ही काही फार मोठी गोष्ट नाही, अशा भ्रमात ते राहिले. मात्र त्यांचा समज चुकीचा आहे. संभाव्य आर्थिक मंदी छोटी व कमी कालावधीची नाही तर अधिक खोल व दीर्घकालिन असणार आहे’, असा इशाराही रुबिनी यांनी दिला. अमेरिकेतील नेते व अधिकारी नाकारत असले तरी अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसणार आहे, असेही रुबिनी यांनी बजावले.

नुरिअल रुबिनी यांनी यापूर्वी २००८-०९ साली आलेल्या महामंदीचे योग्य भाकित वर्तविले होते. त्यामुळे ते ‘डॉक्टर डूम’ या उपाधीने प्रसिद्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मानवजातीवर येणाऱ्या मोठ्या संकटाविषयी त्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. काही महिन्यांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तसेच जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी, जागतिक व्यवस्थेतील जुनी आर्थिक रचना मोडीत निघत असल्याची वक्तव्ये केली होती.

leave a reply